ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 26 - कर्णधार इऑन मॉर्गन आणि जो रूटने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने आज झालेल्या पहिल्या ट्वेंटी-20 लढतीत इंग्लंडने भारतावर तीन गडी राखून मात केली. इऑन मॉर्गन (51) आणि जो रुट (46) यांनी 83 धावांची भागीदारी करत इंग्लंडचा विजय निश्चित केला.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत बहरलेली भारताची फलंदाजी आज सुरू असलेल्या पहिल्या ट्वेंटी-20 लढतीत अडखळली. एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता न आल्याने इंग्लंडच्या तिखट माऱ्यासमोर भारताला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 147 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 148 धावांचे आव्हान ठेवले होते.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारतीय फलंदाजांना फलंदाजीत सातत्य दाखवता आले नाही. महेंद्र सिंग धोनी (नाबाद 36), सुरेश रैना (34) आणि विराट कोहली (29) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अखेर 20 षटकांत भारताला 7 बाद 147 धावाच फटकावता आल्या. तत्पूर्वी आजच्या सामन्यात भारताकडून परवेझ रसूलने आंतरराष्ट्रीय ट्वेेेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.