नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा विजयी वारू रोखत अंतिम फेरीत धडक मारली. जेसन रॉयची धडाकेबाज पाऊणशतकी खेळी व बेन स्टोक्सच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडने किवींची घोडदौड रोखली. गुरुवारी मुंबईत होणाऱ्या भारत-वेस्ट इंडिज या संघातील विजेत्यांशी इंग्लंडची किताबी लढत होईल. या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने न्यूझीलंड अंतिम फेरीत स्थान मिळवेल, अशी अटकळ बांधली जात होती. तमाम क्रिकेटप्रेमींचे डोळे नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर लागले होते. नाणेफेक जिंकून इंग्लंडने न्यूझीलंडला फलंदाजीला आमंत्रित करीत २० षटकांत ८ बाद १५३ धावांवर रोखण्याची किमया केली. त्यानंतर या आव्हानाला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने जेसन रॉयच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर आपला विजयावरील हक्क बळकट केला. रॉयने केवळ ४४ चेंडूंत ७८ धावांची फटकेबाजी करीत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने ११ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने आपली खेळी साजरी केली. रॉय व अॅलेक्स हेल्स (२०) यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची सलामी दिली. हेल्स मिचेल सेंटनरच्या गोलंदाजीवर कॉलिन मनरोकडे झेल देऊन परतला, तर रॉयला इश सोधीने त्रिफळाबाद केले. पाठोपाठच्या चेंडूवर इयान मॉर्गन (०) पायचित झाला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था १ बाद ८२ वरून ३ बाद ११० अशी झाली. त्यानंतर ज्यो रूटने २२ चेंडूंत नाबाद २७, तर ज्योस बटलरने १७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ३२ धावांची खेळी करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)धावफलक : न्यूझीलंड : गुप्तिल झे. बटलर गो. विली १५, विल्यमसन झे. आणि गो. ३२, मनरो झे. अली गो. प्लंकेट ४६, अॅँडरसन झे. जॉर्डन गो. स्टोक्स २८, टेलर झे. मॉर्गन गो. जॉर्डन ६, राँची झे. विली गो. स्टोक्स ३, इलियट नाबाद ४, सेंटनर झे. जॉर्डन गो. स्टोक्स ७, मॅक्लेनघन धावबाद १. २० षटकांत ८ बाद १५३, बेन स्टोक्स ३/२६, जॉर्डन १/२४. इंग्लंड : जेसन रॉय त्रि. गो. सोधी ७८, हेल्स झे. मनरो गो. सेंटनर २०, ज्यो रुट नाबाद २७, ज्योस बटलर नाबाद ३२, १७.१ षटकांत ३ बाद १५९, इश सोधी २/४२, सेंटनर १/२८.
इंग्लंड अंतिम फेरीत
By admin | Published: March 31, 2016 3:15 AM