सिडनी : आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याने केव्हीन पीटरसनशिवाय इंग्लंडचा संघ दुबळा असेल, असे सांगतानाच जुलै महिन्यात होणाऱ्या अॅशेजमध्ये कडवी झुंज मिळण्याची आशाही व्यक्त केली.वेस्ट इंडीजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी कॅरेबियन संघ रवाना होण्याआधी क्लार्कने हे मत व्यक्त केले. वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर संघ पाच कसोटी सामन्यांच्या अॅशेज मालिकेसाठी इंग्लंडला जाणार आहे, ज्याची सुरुवात आठ जुलैपासून कार्डिफ येथे होईल.सर्व क्रिकेट स्वरूपांच्या स्पर्धेत इंग्लंडचा स्टार खेळाडू ३४ वर्षीय पीटरसन सध्याच्या हंगामात इंग्लंड संघात पुनरागमन करण्याची शक्यता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे संचालक अॅण्ड्र्यू स्ट्रॉस यांनी फेटाळून लावली आहे. मोठ्या कालखंडापासून प्रतिस्पर्धी असलेला पीटरसन संघाबाहेर राहणार असल्यामुळे क्लार्कने संमिश्र भावना व्यक्त केली.तो म्हणाला, ‘माझ्यासाठी दोन बाजू आहेत. वैयक्तिक पातळीवर मला पीटरसनसाठी खंत आहे. कारण त्याच्याशी माझे वैयक्तिक चांगले संबंध आहेत आणि त्याला इंग्लंडसाठी पुन्हा खेळताना पाहणे आपल्याला आवडेल. तो शानदार फॉर्ममध्ये आहे. तो खेळू इच्छितो हे मला माहीत आहे. त्यामुळेच मला त्याच्यासाठी दु:ख वाटते.’