कार्डिफ : शानदार फलंदाजीनंतर शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडने न्यूझीलंडचा ८७ धावांनी पराभव केला. या विजयानंतर त्यांनी आयसीसी चॅम्पियन्स चषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली. ‘अ’ गटातून उपांत्य फेरी गाठणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला. इंग्लंडच्या ३११ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव ४४.३ षटकांत २२३ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. मात्र, त्याची ही खेळी न्यूझीलंडला विजय मिळवून देणारी ठरली नाही. विल्यम्सनने मार्टिन गुप्टिलसोबत दुसऱ्या गड्यासाठी ६२ तर रॉस टेलर (३९) सोबत तिसऱ्या गड्यासाठी ९५ धावांची भागीदारी केली. इंग्लंडकडून लियाम प्लंकेटने ५५ धावांत ४, आदिल राशिदने ४७ धावांत २ आणि जॅक बॉलने ३१ धावांत २ बळी घेत शानदार योगदान दिले. त्याआधी, हेल्स, जो रुट आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडपुढे ३११ धावांचे लक्ष्य उभारले. इग्लंडच्या त्रिकुटाने केलेली कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. रुटने (६४) सलामीवीर हेल्ससोबत (५६) दुसऱ्या गड्यासाठी ८१ धावांची तर बेन स्टोक्ससोबत (४८) चौथ्या गड्यासाठी ५४ धावांची भागीदारी केली. बटलरने ४८ चेंडूंत ६१ धावा केल्या. यामध्ये दोन षटकार आणि २ चौकारांचा समावेश आहे. अखेरच्या षटकांत प्लंकेटने १५ धावा चोपल्या. त्यामुळे इग्लंडने ३००चा आकडा पार केला. इग्लंडने प्रथम फलंदाजी करताना गेल्या १३ डावांत ११ व्यांदा ३०० ची धावसंख्या गाठली ओह. न्यूझीलंडकडून कोरी अॅँडरसनने ५५ धावांत ३, अॅडम मिल्नेने ७९ धावांत ३ आणि टीम साउदीने ४४ धावांत २ बळी घेतले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इग्लंडने सावध सुरुवात केली. रॉय याने आठव्या षटकांत मिल्नेच्या पहिल्या षटकांत चौकार ठोकला त्यानंतरच्या चेंडूत मात्र तो ‘क्लिनबोल्ड’ झाला. त्यानंतर हेल्स आणि रुट यांनी डाव सावरला. रुटने फिरकीपटू मिशेल सेंटनरला दोन षटकार आणि एक चौकार ठोकला. रुटने २० व्या षटकांत जिमी नीशामला चौकार लगावात संघाचे शतक पूर्ण केले. हेल्सने ६० चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. याच षटकांत त्याचाही त्रिफळा उडाला.हेल्सने ६२ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकार ठोकत ५६ धावा केल्या. कर्णधार इयान मोर्गन १३ धावांवर बाद झाला. इंग्लंडने ३६ व्या षटकांत २०० धावा पूर्ण केल्या. स्टोक्सची खेळी ४८ धावांवर संपुष्टात आली. मोईन अलीने १२ धावा केल्या. बटलरने अंतिम षटकांत चांगली फटकेबाजी केली. त्याने साउदीच्या षटकात दोन चौकार ठोकले. बटलरने बोल्ट आणि मिल्नेच्या चेंडूवर षटकार ठाकेले. त्याने अवघ्या ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे इग्लंडला ३०० ची धावसंख्या गाठता आली. >संक्षिप्त धावफलकइंग्लंड : ४९.३ षटकांत सर्वबाद ३१0. (ज्यो रुट ६४, ज्योस बटलर ६१. मिल्ने ३/७९, कोरी अँडरसन ३/५५).न्यूझीलंड : ४४.४ षटकांत सर्वबाद २२३. (केन विलियम्सन ८७, रॉस टेलर ३९. जॅक बॉल २/३१, लियोम फ्लुंकेट ४/५५.)
इंग्लंड सेमीफायनलमध्ये
By admin | Published: June 07, 2017 12:31 AM