केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा इंग्लंडचे ६ फलंदाज तंबूत धाडले आहेत. तथापि, त्यानंतरही या लढतीची वाटचाल अनिर्णीत अवस्थेकडे सुरू आहे.इंग्लंडने दुसऱ्या डावात अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा ६ बाद १५९ धावा केल्या असून, त्यांनी १६१ धावांची आघाडी घेतली आहे. अखेरच्या सत्रात ३१ षटके टाकणे बाकी आहेत. दोन्ही संघांनी पहिल्या डावात ६00 पेक्षा जास्त धावा केल्या. विशेष म्हणजे पहिल्या चार दिवसांत १३ विकेटस् गमावून १,२७२ धावा ठोकल्या गेल्या; परंतु अखेरचा दिवशी गोलंदाजांनी निरस सामना रोमहर्षक बनवला.अॅलेस्टर कुक आणि अॅलेक्स हेल हे दिवसाच्या पहिल्या तीन षटकांतच तंबूत परतले. दोघांनी कालच्या धावसंख्येत एकाही धावेची भर घातली नाही. कुकने ८ तर हेल्सने ५ धावा केल्या. कागिसो रबादाने कुकला यष्टिरक्षक क्विंटन डी कॉककरवी झेलबाद करीत दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मोर्ने मॉर्कलच्या चेंडूंवर तिसऱ्या स्लीपमध्ये ख्रिस मॉरीसने हेल्सचा शानदार झेल टिपला.जो रुटने २९ चेंडूंत २९ धावा केल्या; परंतु मॉरीसने डावाच्या त्याच्या पहिल्याच चेंडूंवर जो रुट याला त्रिफळाबाद केले. रुट १७ धावांवर सुदैवी ठरला होता. तेव्हा मॉर्कलच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये अॅबी डिव्हिलियर्सने त्याचा झेल टिपला; परंतु तो नो बॉल ठरला. निक कॉम्पटनदेखील ६0 चेंडूंत १५ धावा केल्यानंतर फिरकी गोलंदाज डेन पीटच्या चेंडूवर फाफ डु प्लेसिसच्या हाती झेल देऊन बसला. इंग्लंडने दुसऱ्या सत्रात बेन स्टोक्स व जेम्स टेलर यांच्या विकेटस् गमावल्या. पहिल्या डावात २५८ धावा करणारा स्टोक्स २६ धावा केल्यानंतर पीटच्या गोलंदाजीवर हवेत खेळण्याच्या प्रयत्नात मिडविकेट सीमारेषेवर झेल देऊन बाद झाला. पीटच्या पुढच्या षटकांत टेलरदेखील शॉर्टलेगवर तेंबा बावुमाच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. टेलरने ३७ धावा केल्या. त्या वेळेस संघाची धावसंख्या ६ बाद ११६ अशी झाली. त्यानंतर जॉनी बेयरस्टा (नाबाद ३0) आणि मोईन अली (नाबाद १0) यांनी चहापानापर्यंत संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : इंग्लंड ६ बाद ६२९ (घोषित). दुसरा डाव ६५ षटकांत ६ बाद १५९. (बेयरस्टा खेळत आहे ३0, जो रुट २९, टेलर २७, स्टोक्स २६, मोईन अली खेळत आहे १0. पीट ३/३८, मॉर्कल १/२६, रबाडा १/५७, मॉरीस १/२४). दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) ७ बाद ६२७ (घोषित).
इंग्लंडची दुसऱ्या डावात घसरगुंडी
By admin | Published: January 07, 2016 12:12 AM