ब्रिस्टल : महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान मंगळवारी पहिली उपांत्य लढत रंगणार आहे. यजमान संघाची सलामीवीर महिला फलंदाज टॅमी बियुमोंटने प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्यास सज्ज असल्याचे म्हटले आहे. इंग्लंडला साखळी फेरीत सलामी सामन्यात भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मात्र या संघाने सलग सहा सामने जिंकण्याचा पराक्रम केला. त्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६८ धावांनी मिळविलेल्या विजयाचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिका संघाने चार सामने जिंकले असून दोन सामने गमावले तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. आता मात्र उभय संघांची नजर लॉर्ड््सवर खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीवर केंद्रित झाली आहे. बियुमोंट म्हणाली, ‘आम्ही साखळी फेरीत त्यांचा पराभव केला असला तरी मंगळवारी एक नवी लढत राहणार आहे. दक्षिण आफ्रिका संघ साखळी फेरीतील पराभवाची परतफेड करण्यास प्रयत्नशील राहील. आम्ही भारताविरुद्धचा पराभव विसरून कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरलो आहोत. खेळाच्या काही विभागात अद्याप सुधारणा करण्याची संधी आहे.’ द. आफ्रिकेची कर्णधार म्हणाली, ‘आम्ही या लढतीबाबत उत्सुक आहोत. (वृत्तसंस्था)बियुमोंटने या स्पर्धेत सात डावांमध्ये ३७२ धावा फटकावल्या आहेत. पण तिच्यासह इंग्लंडच्या अन्य महिला फलंदाजांना स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या डेन वान नीकर्कच्या गोलंदाजीला सामोरे जावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने आतापर्यंत सहा सामन्यांत १५ बळी घेतले आहे. तिच्या मते या लढतीत दडपण यजमान संघावर राहणार आहे.
इंग्लंड-दक्षिण आफ्रिका पहिली उपांत्य लढत आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 3:12 AM