मुंबई : बांगलादेश दौरा आटोपल्यानंतर कर्णधार अॅलिस्टर कूक याच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाचे भारत दौऱ्यासाठी बुधवारी मुंबई विमानतळावर आगमन झाले. ९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत भारत व इंग्लंड यांच्यामध्ये ५ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळविण्यात येणार आहेत. नुकत्याच बांगलादेशामध्ये झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला यजमानांविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. भारत-इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ९ ते १३ नोव्हेंबरदरम्यान राजकोट येथे खेळविण्यात येईल. दरम्यान, बांगलादेशाविरुद्ध अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यानंतर इंग्लंड संघाचा भारतात कोणताही सराव सामना होणार नाही. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. याच वेळी इंग्लंडचे एकमात्र सराव शिबिर ५ नोव्हेंबर रोजी क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे होणार आहे. यानंतर इंग्लंड संघ राजकोटला पहिला कसोटी सामना खेळण्यास रवाना होईल. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) बांगलादेश दौऱ्यावर गेलेला आपला १६ सदस्यीय संघ भारत दौऱ्यासाठी कायम ठेवला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा संघात समावेश नाही. ३४ वर्षीय अँडरसन इंग्लंडकडून ११९ कसोटी सामने खेळलेला असून, त्याने ४६३ बळी घेतले आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)
इंग्लंड संघाचे मुंबईत आगमन
By admin | Published: November 03, 2016 4:27 AM