ब्रिस्टॉल : अनुभवी सराह टेलरने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर बलाढ्य इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा २ विकेट्सने रोमांचक पराभव करून महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आफ्रिकेने दिलेल्या २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने ४९.४ षटकांत ८ बाद २२१ धावा काढल्या.दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. दरम्यान, तरीही इंग्लंडसाठी धावांचा पाठलाग करणे सोपे गेले नाही. ठराविक अंतराने धक्के बसत गेल्याने इंग्लंडच्या धावगतीवरही परिणाम झाला. मात्र, एक बाजू लावून धरलेल्या टेलरने ७६ चेंडंूत ७ चौकारांसह संयमी ५४ धावांची खेळी केली. कर्णधार हीथर नाइट (३०) आणि फ्रॅन विल्सन (३०) यांनी चांगली फलंदाजी केली. अखेरच्या फळीमध्ये जेनी गनने २७ चेंडूंत नाबाद २७ धावा करून इंग्लंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अयाबोंगा खाका आणि सुन लूस यांनी प्रत्येकी २ बळी घेत इंग्लंडला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने ५० षटकांत ६ बाद २१८ धावा केल्या होत्या. सलामीवीर लॉरा वोल्वार्ड (१०० चेंडूंत ६६) आणि मिगनन डू प्रीझ (९५ चेंडूंत नाबाद ७६) यांच्या फलंदाजीच्या जोरावर समाधानकारक मजल मारली.
इंग्लंडची अंतिम फेरीत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 2:00 AM