नवी दिल्ली : भारत दौऱ्यात स्थानिक परिस्थितीवर मात करण्यासाठी इंग्लंडच्या ‘नाकी नऊ’ येण्याची दाट शक्यता असल्याने या दौऱ्यात पाहुण्यांना चांगलेच झुंजावे लागेल, असे भाकीत द. आफ्रिकेचा माजी फलंदाज जाँटी ऱ्होडस् याने केले आहे.इंग्लंड संघ भारतात पाच कसोटी सामने खेळणार असून, मालिकेतील पहिला सामना राजकोट येथे ९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-२० आणि तीन वन-डे सामनेदेखील खेळले जातील. ‘आयपीएल’मधील मुंबई इंडियन्स संघाचे दीर्घकाळ क्षेत्ररक्षण कोच राहिलेले ऱ्होडस् म्हणाले, ‘इंग्लंडसाठी भारतातील परिस्थिती विपरीत आहे. पाच कसोटी सामने खेळताना हा संघ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचून जाईल. परिस्थिती अनुकूल नसल्याने खेळाडूंवर दडपण वाढत जाईल.’तीन सामन्यांची कसोटी मालिका असती तर खेळाडूंना सावरण्यास वेळ मिळाला असता असे सांगून ऱ्होडस् पुढे म्हणाले, ‘पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणे फारच कंटाळवाणे होऊन जाते.’ टी-२० क्रिकेट केवळ मनोरंजन नसून, या लहान प्रकारातही विराट कोहलीसारखे उत्कृष्ट खेळाडू घडल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ऱ्होडस् हे द. आफ्रिकेसाठी ५२ कसोटी आणि २४५ वन-डे खेळले आहेत. इंडियन ज्युनिअर प्लेअर्स लीग टी-२० स्पर्धेसाठी मेंटर म्हणून ऱ्होडस् येथे आले आहेत. (वृत्तसंस्था)
इंग्लंडला भारतात झुंजावे लागेल : जाँटी
By admin | Published: November 05, 2016 5:33 AM