कार्डिफ : पाकिस्तानविरुद्ध आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या बुधवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य लढतीत यजमान इंग्लंडचे पारडे वरचढ भासत आहे. इंग्लंड संघ ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये आयसीसीच्या स्पर्धेत पहिले जेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास उत्सुक आहे. तीनवेळा विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या इंग्लंडला गेल्या ४२ वर्षांत ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये जेतेपद पटकावता आलेले नाही. इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील संघ समतोल भासत असून, या वेळी जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. पहिल्या लढतीत भारताविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाने दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली २०१५ मध्ये आयोजित विश्वकप स्पर्धेत पहिल्या फेरीत गाशा गुंडाळणाऱ्या इंग्लंड संघाने त्यानंतर कामगिरीत चांगली सुधारणा केली. गेल्या वर्षी त्यांनी मायदेशात खेळताना पाकिस्तानचा वन-डे सामन्यांच्या मालिकेत ४-१ ने पराभव केला, त्यात ट्रेंटब्रिजमध्ये फटकावलेल्या विश्वविक्रमी ४४४ धावसंख्येचा समावेश होता. पाक आव्हान देणार का? आतापर्यंत इंग्लंड स्पर्धेतील सर्वोत्तम संघ आहे. त्यांनी एकही लढत गमावलेली नाही. दुसऱ्या बाजूचा विचार करता पाकिस्तानने कर्णधार सरफराज अहमदच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेचा तीन गडी राखून पराभव केला. या विजयामुळे पाक संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. सोमवारी झालेल्या पराभवासाठी श्रीलंका संघ स्वत:च जबाबदार आहे. श्रीलंका संघाचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते. सलामीवीर फखर जमानने श्रीलंकेविरुद्ध ३६ चेंडूंना सामोरे जाताना ५० धावांची खेळी केली. पण मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर, जुनेद खान, हसन अली व फहीम खान यांनी छाप सोडली आहे. हे ठरतील ‘मॅच विनर’बेन स्टोक्सच्या रूपाने इंग्लंडकडे जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तो फलंदाजी व गोलंदाजीमध्ये कुठल्याही संघाविरुद्ध वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये २० लाख डॉलरची विक्रमी किंमत मिळाली होती. जो रुटही विश्वदर्जाचा फलंदाज असून तो फॉर्मातही आहे. मधल्या फळीतील मोर्गन व जोस बटलर आहेत, तर सलामीला एलेक्स हेल्स व जेसन रे संघाला चांगली सुरुवात करून देत आहेत. वेगवान गोलंदाजांमध्ये जॅक बॉल व लियाम प्लंकेट यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे, तर मार्क वूडने स्ट्राईक बॉलर म्हणून कर्णधार मॉर्गनचा विश्वास सार्थ ठरविला आहे. टाचेवर तीनदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर वूड संघात परतला आहे. त्याचा वेग तसूभरही कमी झालेला नाही. उभय संघ यातून निवडणारइंग्लंड : इयॉन मोर्गन(कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, जॅक बॉल, सॅम बिलिंग्स, अॅलेक्स हेल्स, जोश बटलर, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रुट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टीव्हन फिन.पाकिस्तान : सर्फराज अहमद(कर्णधार), अहमद शहजाद, अजहर अली, बाबर आजम, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस सोहेल, हसन अली, इमाद वसीम, जुनैद खान, मोहम्मद आमिर , मोहम्मद हफीज, शादाब खान,शोएब मलिक.
इंग्लंडचे पारडे जड
By admin | Published: June 14, 2017 3:46 AM