कोलंबो : भारताची सलामीची फलंदाज तिरुष कामिनीचे शतक आणि दीप्ती शर्माबरोबर केलेल्या भागीदारीच्या जोरावर भारताने आयर्लंडवर १२५ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच भारताने आयसीसी महिला जागतिक चषक पात्रता फेरीच्या सुपरसिक्समध्ये प्रवेश केला आहे. कामिनी हिने १४६ चेंडूंत ११ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ११३ धावा केल्या. तिने दीप्तीसोबत पहिल्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी केली. महिला क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी भारताकडून करण्यात आलेली ही पहिली भागीदारी आहे. या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या चांगल्या सुरुवातीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना २५० धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ ४९.१ षटकांत १२५ धावांवर तंबूत परतला. त्यांच्याकडून गॅबी लुईस हिने ३३ तर इसोबेल जोएसने ३१ धावा केल्या. भारताची लेगस्पिनर पुनम यादव हिने ३० धावा देत तीन गडी बाद केले. तर शिखा पांडे, देविका वैद्य आणि एकता बिष्ट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ‘ग्रुप ए’मध्ये भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. त्यामुळे सुपरसिक्समध्ये पोहोचणारा भारत हा पहिला संघ बनला आहे. तीन सामन्यांतील विजयासह भारताचे तीन गुण आहेत. भारताने आपली पहिली विकेट दीप्तीच्या रूपात ४०व्या षटकांत गमावली. तिने १२८ चेंडूंत ८९ धावा केल्या. तर वेदा कृष्णमूर्ती हिने ११ अणि हरमनप्रीत कौर हिने २० धावा केल्या. (वृत्तसंस्था)भारत - ५० षटकांत २ बाद २५० धावा. (दीप्ती शर्मा ८९, तिरुष कामिनी ११३, वेदा कृष्णमूर्ती ११, हरमनप्रीत कौर २०. गोलंदाजी - इसाबेल जोएस १/३९, किम ग्राथ १/३८) वि.वि. आयर्लंड : ४९.१ षटकांत सर्वबाद १२५ धावा. (गॅबी लुईस ३३, इसोबेल जोएसने ३१, लॉरा डेलनी २१. गोलंदाजी पूनम यादव ३ /३०, शिखा पांडे २/११, एकता बिष्ट २/१५, देविका वैद्य २/११)
आयर्लंडला नमवून बलाढ्य भारत सुपरसिक्समध्ये दाखल
By admin | Published: February 11, 2017 12:39 AM