- रोहित नाईकमुंबई : अर्नेस्टविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी मी सज्ज असून त्याने मला दोन मिनिटामध्ये लोळवण्याचे लक्ष्य बाळगले असल्याचे कळाले. मला वाटते त्याचे हे आव्हान बालिशपणाचे असून खरा मुकाबला रिंगमध्येच रंगेल. त्याचेवेळी त्याला कळेल की सिंग इज किंग,’ अशा शब्दांत भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग याने घानाचा बॉक्सर अर्नेस्ट अमुजू याला इशारा दिला आहे. विजेंदरने या लढतीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे ‘लोकमत’कडे सांगतानाच प्रतिस्पर्धी अर्नेस्टला नमवण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.
२३ डिसेंबरला जयपूर येथे विजेंदर सिंग आपली दहावी व्यावसायिक लढत खेळणार आहे. आतापर्यंत अपराजित असलेल्या विजेंदरने सलग ९ लढती जिंकताना व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये आपला हिसका दाखवला आहे. अर्नेस्टकडे २५ लढतींचा अनुभव असून यापैकी त्याने २३ लढती जिंकल्या आहेत. असे असले, तरी केवळ ९ लढतींचा अनुभव असलेल्या विजेंदरकडे डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक आणि ओरिएंटल सुपर मिडलवेट अशी दोन जेतेपद आहेत, तर अर्नेस्टकडे एकही जेतेपद नाही.
या गोष्टीकडे लक्ष वेधताना विजेंदरने ‘लोकमत’ला सांगितले की, ‘अर्नेस्टने भलेही मला आव्हान दिले असेल, तरी त्याने विसरु नये की माझ्याकडे दोन बेल्ट आहेत, तर त्याच्याकडे एकही नाही. त्यामुळे असे बालिशपणाचे आव्हान माझ्यापुढे त्याने देऊ नये. अर्नेस्टला परिपक्व बनण्यास आणखी वेळ लागेल.’
विजेंदरच्या लढतीदरम्यान सहा अन्य भारतीय बॉक्सर अंडरकार्ड लढती खेळणार आहेत. याविषयी विजेंदर म्हणाला की, ‘नक्कीच ही भारतासाठी आनंदाची बाब आहे. आज प्रो बॉक्सिंगकडे खेळाडूंची रुची वाढत आहे. परंतु, खेळाडूंनी ग्लॅमर किंवा पैसा पाहून येथे येऊ नये. प्रो बॉक्सर जरी वैयक्तिकरीत्या खेळत असला, तरी त्याच्यावर देशाचे नाव उंचावण्याची जबाबदारी असते. त्यामुळे व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनतीशिवाय जिद्दही असावी लागते.’ खंत आॅलिम्पिकची....व्यावसायिक बॉक्सिंग हौशी बॉक्सिंगच्या तुलनेत पूर्ण वेगळे असते. व्यावसायिक बॉक्सिंगला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला देशाकडून खेळता येत नाही. परिणामी आॅलिम्पिकमध्येही सहभागी होता येत नाही. आॅलिम्पिक पदक हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, पण व्यावसायिक बॉक्सर म्हणून हे स्वप्न कधीच पूर्ण करता येत नाही याची खंत कायम राहणार, असेही विजेंदरने यावेळी म्हटले.यंदाच्या वर्षातील ही माझी अखेरची लढत असल्याने मला विजयी सांगता करायची आहे. जयपूर माझ्यासाठी नेहमीच एक भावनिक स्थळ राहिले आहे. येथे मी रेल्वेत टीसी म्हणून काम करत असताना राहिलो होतो. माझ्या देशवासीयांना वर्षाअखेरीस जल्लोष करण्याची संधी मी नक्की देईल.- विजेंदर सिंग