मुंबई - स्वित्झर्लंड येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद सायकल शर्यतीत अंदमान-निकोबार बेटावरील इसोव अल्बान या युवा खेळाडूने भारतीयांना अभिमानास्पद वाटेल अशी फिनिक्स भरारी घेतली. अंगावर शहारे आणणाऱ्या शर्यातीत इसोवने भारताला जागतिक स्पर्धेतील पहिलेवहिले पदक जिंकून दिले. अवघ्या 0.017 सेकंदाच्या फरकाने इसोवला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली, परंतु त्याचे हे रौप्यपदक अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
कनिष्ठ गटातील जागतिक क्रमावारीत अव्वल स्थानावर असलेल्या अंदमान-निकोबारच्या या खेळाडूने पुरूषांच्या केइरीन प्रकारात स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रौप्यपदक जिंकले. झेक प्रजासत्ताकच्या जाकूब स्टॅस्टनीने 200 मीटरची ही शर्यत 10.851 सेकंदात पूर्ण केली. इसोवने कझाकस्तानच्या अँड्री चूगायवर मात केली. मलेशियात नुकत्याप पार पडलेल्या आशियाई ट्रॅक अजिंक्यपद स्पर्धेत इसोवने तीन सुवर्णपदक पटकावली होती.