Euro 2024 England Record: विम्बल्डन स्पर्धेत स्पेनच्या अलकाराजने विजय मिळवल्यानंतर, युरो कप फायनलमध्येही ( UEFA European Championship ) स्पेनच्या संघाने कमाल केली. अंतिम फेरीत स्पेनच्या संघाने २-१ असा इंग्लडचा पराभव करून युरो कपची फायनल जिंकली. विजेतेपदासह स्पेनने एक मोठा विक्रम केला. त्यांनी चौथ्यांदा युरो कप जिंकला आणि सर्वाधिक वेळा युरो कप जिंकणारा देश बनला. याआधी स्पेन व जर्मनी दोघेही ३ विजेतेपदांसह संयुक्त अव्वल होते. इंग्लंडनेदेखील पराभवासोबत एक नकोसा विक्रम आपल्या नावे केला.
इंग्लंडच्या संघाचा युरो कपच्या फायनलमध्ये पराभव झाला. ही नामुष्की इंग्लंडवर सलग दुसऱ्यांदा ओढवली. गेल्या हंगामात इंग्लंड संघ अंतिम सामन्यात इटलीकडून पराभूत झाला होता. नियोजित वेळेतील सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. त्यानंतर पेनल्टी शूट-आऊटमध्ये इटलीने इंग्लंडचा ३-२ असा पराभव केला होता. या वर्षीही इंग्लंडचा पराभव झाला. स्पेनने इंग्लंडला नियोजित वेळेतील सामन्यात २-१ असे पराभूत केले. सलग दोन फायनलमध्ये पराभवाची नामुष्की ओढवलेला इंग्लंड हा पहिलाच देश ठरला.
मिकेल आणि निको विल्यम्स यांनी अंतिम सामन्यात स्पेनकडून प्रत्येकी १-१ गोल केले. सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत सुटला होता. पण, सामन्याच्या उत्तरार्धात ३ गोल झाले. सुरुवातीला ४७व्या मिनिटाला निको विल्यम्सने गोल केला. तर ७३व्या मिनिटाला इंग्लंडकडून कोल पाल्मरने गोल करत १-१ अशी बरोबरी केली. अखेर ८६व्या मिनिटाला मिकेल ओयारजबलने स्पेनला पुन्हा २-१ची आघाडी मिळवून दिली. ही आघाडी स्पेनने सामना संपेपर्यंत टिकवून ठेवल्याने इंग्लंडचा पराभव झाला.