लंडन : रशियामध्ये २०१८ साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रही न ठरलेल्या इटलीने सर्व कसर भरून काढताना यंदाच्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या अत्यंत थरारक सामन्यात इटलीने तगड्या स्पेनला ४-२ असा धक्का दिला. यासह इटलीने गेल्या सलग ३३ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची विक्रमी कामगिरीही केली आहे.वेम्बले स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात अत्यंत दबावाच्या परिस्थितीमध्ये जोरगिन्होने इटलीचा विजयी गोल साकारला. निर्धारित वेळेनंतर अतिरिक्त वेळेतही सामना १-१ बरोबरी सुटला. यानंतर विजेता ठरविण्यासाठी पेनल्टी शूटआऊटची मदत घेण्यात आली. फेडरिको चीसाने ६०व्या मिनिटाला शानदार गोल करत इटलीला आघाडीवर नेले होते. मात्र, ८०व्या मिनिटाला अल्वारो मोराटाने महत्त्वपूर्ण गोल करत स्पेनला बरोबरी साधून दिली.मोराटाने गोल केला असला, तरी सध्या त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. त्याला स्पर्धेत पहिल्यांदाच सुरुवातीपासून अंतिम संघात स्थान मिळाले नाही. तसेच स्पर्धेदरम्यान त्याला अनेकदा अपशब्दांचा सामना करावा लागला. तसेच आपल्या देशाच्या पाठिराख्यांकडून त्याला जीवे मारण्याची धमकीही मिळाली होती. त्यातच पेनल्टी शूटआऊटमध्ये त्याला गोल करण्यात अपयश आल्याने पुन्हा एकदा त्याला टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीच्या मॅन्युएल लोकाटेलीची पहिली पेनल्टी स्पेनचा गोलरक्षक उनाई सिमोन याने रोखली. मात्र, यानंतर आंद्रिया बेलोटी, बोनुची, फेडरिको बर्नार्डेची आणि जोरगिन्हो यांनी शानदार गोल करत इटलीला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
बुमराह- संजना यांची सामन्याला हजेरी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याची ॲंकर पत्नी संजना गणेशन सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांनी वेम्बले स्टेडियममध्ये हजेरी लावून इटली- स्पेन यांच्यात झालेला युरो चषक फुटबॉलचा उपांत्य सामना पाहिला. दोघांनी सुंदर फोटो शेअर केला आहे.