ऑनलाइन लोकमत
फ्रान्स, दि. 11-फुटबॉलच्या विश्वातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा असलेल्या युरो चषकाला आजपासून सुरूवात झाली. युरो चषकात फ्रान्स आणि रोमानियामध्ये झालेल्या पहिल्याच लढतीत फ्रान्सनं 2-1नं आघाडी मिळवली आहे. त्यामुळे अर्थातच फ्रान्सचा आत्मविश्वास दुणावला आहे.
10 जून ते 10 जुलै या महिनाभराच्या कालावधीत फ्रान्सच्या दहा शहरांतील दहा स्टेडियम्समध्ये युरो चषकाचं सामने होत आहेत. पॅरिस, सेन्ट डेनिस, लिल, लान्स, लिऑन, बोर्डो, मार्सेई, नीस, सेन्ट एतिएन आणि ट्यूलूजमध्ये युरो चषकाचे एकूण 51 सामने खेळवले जातील. युरो चषकाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच 24 संघ सहभागी झाले असून, या संघांची सहा गटांत विभागणी केली आहे. ग्रुप एमध्ये यजमान फ्रान्ससह, रोमानिया, अल्बानिया आणि स्वित्झर्लंडचा समावेश आहे. फ्रान्सनं रोमानियावर मिळवलेल्या धडाकेबाज विजयामुळे चाहत्यांचा पाठिंबा वाढला आहे.
ग्रुप एमधून फ्रान्सचा बाद फेरीतला प्रवेश निश्चित मानला जातोय. ग्रुप बीमध्ये इंग्लंडची रशिया, वेल्स आणि स्लोव्हाकियाशी टक्कर रंगणार असून, ग्रुप सीमध्ये जर्मनी, युक्रेन, पोलंड आणि नॉर्दन आय़र्लंडचे सामाने होणार आहेत. ग्रुप डीमध्ये गतविजेत्या स्पेनसह, चेक रिपब्लिक, तुर्कस्तान आणि क्रोएशियाचा समावेश आहे. ग्रुप ईमध्ये बेल्जियम, इटली, रिपब्लिक ऑफ आयर्लंड आणि स्वीडन हे बलाढ्य संघ आमनेसामने येणार असल्यानं हा गट युरो चषकातला ग्रुप ऑफ डेथ समजला जाणार आहे.. ग्रुप एफमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालसह आईसलँड, ऑस्ट्रिया आणि हंगेरीचा समावेश आहे.