ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - ऑस्ट्रेलियाविरुद्घच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला अनपेक्षितरित्या दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघासमोरही मालिकेत पुनरागमन करण्याचे आव्हान आहे. मात्र मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने याआधी केलेला आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने तीनवेळा पहिली कसोटी गमावल्यानंतरही कमबॅक करत कसोटी मालिका जिंकल्या आहॆत. 1972-73 साली इंग्लंडविरुद्ध, 2001 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 साली श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला होता.
त्यापैकी 1972-73 साली इंग्लंडविरुद्ध झालेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दिल्लीत झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. मात्र अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कोलकाता आणि चेन्नईत झालेल्या दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर चौथी आणि पाचवी कसोटी अनिर्णित राखत मालिका जिंकली.
त्यानंतर 2001 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ऐतिहासिक कसोटी मालिकेत मुंबईतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र गांगुलीची आक्रमक कप्तानी आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मणच्या संस्मरणीय कामगिरीच्या जोरावर भारताने कोलकाता आणि चेन्नईतील सामने जिंकत ही मालिका 2-1 अशा फरकाने खिशात घातली होती.
गेल्यावर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला गॉल येथील पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र कोलंबोत झालेले पुढचे दोन्ही सामने जिंकून या मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला होता.