मडगाव : लॉस एंजेलिस आॅलिम्पिक स्पर्धेत अवघ्या एक दशांश सेकंदानी हुकलेल्या पदकाचे शल्य आजही बोचत असल्याची खंत भारताची धावराणी पी.टी. उषा हिने व्यक्त केली. ‘पाय्योली एक्स्प्रेस’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या पी.टी. उषा हिच्या हस्ते येथील रवींद्र भवनात आयोजित दोन दिवसांच्या ‘रिल्स आॅन हिल्स’ या सायकलिंग व धावणे यावर आधारित चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी तिने पत्रकारांशी संवाद साधला. या धावपटूने आॅलिम्पिक पदकाचे स्वप्न पुढील पिढी निश्चित पूर्ण करेल, असा विश्वासही व्यक्त केला.
ती म्हणाली, आज खेळाडूंना सोयीसुविधा आहेत. सिंथेटिक ट्रॅक प्रत्येक राज्यात उपलब्ध आहेत. आमच्याकाळी सिंथेटिक ट्रॅक नव्हते. फिजोथिरेपिस्ट, मसाज सारख्या सुविधा नव्हत्या. विदेशी प्रशिक्षक दिमतीला नव्हते. आजच्या अॅथलिटचा परफॉर्मन्स चांगला आहे. याचा देशाला नक्की फायदा होईल. सामाजिक बांधिलकी ठेवून कॉर्पोरेट जगतही मदतीसाठी धावून येत आहे. हा उपक्रम स्वागतार्ह आहे. यामुळे खेळाडूंना आर्थिक मदत मिळेल तसेच त्यांच्या अडचणी दूर होतील.
उषाची अकादमी...कालिकत येथे ज्याला आता ‘किनारो’ या नावाने ओळखले जाते तेथे आपण अकादमी सुरू केल्याची माहिती उषाने दिली. ‘उषा स्कूल आॅफ आॅथोरिटी’ या नावाने ही अकादमी असून अनेक होतकरू खेळाडू तेथे तयार होत असल्याचे तिने सांगितले. १२ ते २८ वर्षांपर्यंतचे खेळाडू या अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत. काहीजणांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे. तेडुंलुका हिने आशिया स्पर्धेत आपली चुणूक दाखविली आहे तसेच जॅसी जोसेफ हिने ज्युनियर गटात आशिया स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. अशा खेळाडूंना योग्य पद्धतीने प्रशिक्षण मिळाल्यास देशाचे खेळातील भवितव्य उज्ज्वलच असेल. केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड हे स्वत: एक खेळाडू आहेत. सरकारकडून योग्य ते सहकार्य मिळत असून खेळाडूंनीही केवळ आपल्या ध्येयाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असा सल्लाही तिने दिला.