ऑनलाइन लोकमत
कुआंटन, दि. 31 - आता प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेत विजेतेपद पटकावण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, अशी प्रतिक्रिया भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलेंट ओल्टमेन्स यांनी व्यक्त केली. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपद पटकावणा-या संघाची प्रशंसा करता ते बोलत होते. भारताने रविवारी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३-२ ने पराभव करीत सलग दुस-यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. ओल्टमेन्स म्हणाले,‘भारतीय खेळाडूंपुढे येथे जेतेपद पटकावण्याशिवाय दुसराकुठला पर्याय नव्हता. कारण भारतीय संघ येथे जेतेपदाचा दावेदार म्हणून सहभागी झाला होता. अन्य संघांची नजर आमच्या कामगिरीवर होती. त्यामुळे आमच्यावर दडपण होते. मला या संघाचा अभिमान वाटतो. अखेरच्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने मानसिक कणखरता सिद्ध करताना विजेतेपद पटकावले. आम्ही सुरुवातीला दोन गोल खात प्रतिस्पर्धी संघाला वर्चस्व गाजवण्याची संधी दिली होती. भारतीय हॉकी चाहत्यांसाठी हा मोठा विजय आहे, पण आता जागतिक स्पर्धेत जेतेपद पटकावण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.’ अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करणारा मिडफिल्डर सरदार सिंग म्हणाला,‘भारतीय संघातर्फे देशवासीयांना हे दिवाळीचे गिफ्ट आहे.’