मुंबई : ‘क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या शानदार नेतृत्वाखाली भारतीय संघाला भक्कम केले. तसेच त्याने आपल्या संघाला एक लक्ष्य निर्धारित करून दिले. या जोरावरच भारतीय क्रिकेट संघाला पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमवण्यात यश आले. त्यामुळेच आज प्रत्येक खेळामध्ये कोहलीसारख्या भक्कम नेतृत्वाची गरज आहे,’ असे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी म्हटले.रविवारी गेट वे ऑफ इंडिया येथे २०१७-१८ सालाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी मल्लखांब खेळासाठी स्वत:ला झोकून दिलेले आणि या मराठमोळ्या खेळाला आंतरराष्ट्रीय चेहरा देणारे मुंबईचे ज्येष्ठ प्रशिक्षक उदय देशपांडे यांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने, तर साताऱ्याच्या प्रियांका मोहिते यांना गिर्यारोहणातील शानदार कामगिरीसाठी साहसी खेळाचा शिवछत्रपती पुरस्कार राज्यपाल आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे, १५ क्रीडा मार्गदर्शक ७ क्रीडा संघटक-कार्यकर्ते, ९ दिव्यांग खेळाडू आणि विविध खेळांमध्ये महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या ५५ खेळाडू यांचाही राज्यपाल व क्रीडामंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. काही दिवसांपूर्वी पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांचे स्मरण करताना यंदाचा पुरस्कार सोहळा साधेपणाने करण्यात आला. त्याचवेळी सोहळ्यादरम्यान जीवनगौरव पुरस्कार विजेते उदय देशपांडे यांच्या शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिरच्या खेळाडूंनी मल्लखांबचे नेत्रदीपक आणि थरारक सादरीकरण करुन उपस्थितांना खिळवून ठेवले. त्याचप्रमाणे, धारावी क्रीडा संकुलातील युवा खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्स सादरीकरणाने सोहळ्यात रंगत आणली. खेळांना दैनंदिन जीवनात महत्त्व देणे गरजेचे असल्याचे नमूद करताना राज्यपाल म्हणाले की, ‘भारत आज विकसित देश म्हणून नावारुपास येत आहे. प्रत्येक विकसित देश खेळांमध्येही पुढे असून त्यांच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीवर हे दिसून येते. २०२० सालापर्यंत आपला देश सरासरी २९ वय असलेला जगातील सर्वात युवा देश बनेल. त्यामुळे भारतीयांनी क्रीडा स्पर्धांमध्ये वर्चस्व राखले पाहिजे,’ असे राज्यपाल म्हणाले. ‘आज प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये एकदिवस ‘वार्षिक क्रीडा महोत्सव’ आयोजित केला जातो. असे कार्यक्रम किंवा उपक्रम केवळ एकच दिवस का साजरे होतात असा प्रश्न मला नेहमी पडतो. वर्षातील एक दिवस ‘स्पोर्ट्स डे’ साजरा करुन आपल्या देशात क्रीडा संस्कृती रुजणार नाही. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात खेळांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे,’ असेही राज्यपाल राव यांनी यावेळी सांगितले.
शहिदांच्या कुटुंबियांना खेळाडूंची मदतराज्यपाल आणि क्रीडामंत्री यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुण्याची बुद्धिबळपटू सलोनी सापळे आणि मुंबई उपनगरचा स्क्वॉशपटू महेश माणगावकर यांनी शिवछत्रपती पुरस्कार म्हणून मिळालेले रोख एक लाखाचे पारितोषिक पुलवामा अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या दोन जवानांच्या परिवारास मदत म्हणून दान केले. यावेळी सलोनी म्हणाली की, ‘मी माझ्या पुरस्काराची रोख रक्कम पुलवाम येथे शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या दोन जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून सुपूर्द करत आहे. आज भारतमातेच्या जवानांच्या सतर्कतेमुळेच आम्ही खेळाडू सुरक्षितपणे सराव करु शकतो आणि त्यामुळेच आम्ही राज्याचे व राष्ट्राचे नाव उंचावू शकतो. त्यामुळेच माझ्याकडून जवानांच्या कुटुंबियांसाठी छोटी मदत करत आहे.’ स्क्वॉशपटू महेश माणगावकर सध्या जर्मनीत असल्याने तो या सोहळ्यास उपस्थित नव्हता. मात्र त्याच्यावतीने पुरस्कार स्वीकारताना त्याचे वडिल दयानंद माणगावकर यांनी म्हटले की, ‘महेश सध्या जर्मनीत आहे. त्याला या पुरस्काराचे स्वरुप माहित नाही. मात्र त्याने म्हटले होते की, या पुरस्कारासोबत जी काही रक्कम मिळेल ती सर्व शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून द्या.’
आज पालकांचा खेळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल असून ही खूप चांगली बाब आहे. यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यास प्रोत्साहन मिळत आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंना सरकारी नोकरीसाठी प्राधान्य देतानाच अशा खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार थेट नियुक्तीही देण्यात येत आहे.- विनोद तावडे, क्रीडामंत्री