जमैकाच्या ‘उसेन बोल्ट’ने ‘पृथ्वीतलावरील सर्वांत वेगवान माणूस’ आपल्याला का म्हणतात हे सिद्ध केले. पात्रता फेरीतील सर्वसाधारण कामगिरी केवळ औपचारिकता असल्याचे सिद्ध करीत त्याने २०० मीटरच्या अंतिम फेरीत आपला हिसका दाखवून सहजपणे जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या विजेतेपदासह त्याने सलग चौथ्यांदा जागतिक २०० मीटर स्पर्धेत बाजी मारण्याचा पराक्रम केला.अमेरिकेच्या जस्टीन गॅटलिन याने दिलेले आव्हान सहजपणे परतावत बोल्टने १९.५५ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदकावर नाव कोरले, तर गॅटलिनला १९.७४ सेकंदांच्या वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या अनासो जोबोद्वाना याने १९.८७ सेकंदांची वेळ नोंदवून कांस्यपदक पटकावले.चांगली सुरुवात केलेल्या गॅटलिनला आपला वेग कायम राखण्यात यश आले नाही. त्याचप्रमाणे यंदाच्या मोसमात एकूण कामगिरी पाहिल्यास या वेळी गॅटलिनला संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. मात्र, बोल्टने सर्वांचे तर्क चुकीचे ठरवताना आपणच वेगाचे बादशाह असल्याचे सिद्ध केले.
सबकुछ ‘बोल्ट’
By admin | Published: August 28, 2015 1:13 AM