बॅकवॉटरमध्ये कौशल्य, समन्वय, सांघिक भावनेचा जल्लोष; ट्रॉपिकल टायटन्सने जिंकली हजारो प्रेक्षकांची मने
By विशाल सोनटक्के | Published: November 26, 2022 09:50 PM2022-11-26T21:50:41+5:302022-11-26T21:51:07+5:30
चॅम्पियन बोट लीग : सामन्यासाठी बॅकवॉटर परिसरात सकाळपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आणि आवेश दिसून येत होता.
- विशाल सोनटक्के
कोल्लम (केरळ) : भारतातील पहिली बोट रेस आणि जगातील सर्वात मोठी जलक्रीडा स्पर्धा असलेल्या चॅम्पियन बोट लीग स्पर्धेवर अखेर शनिवारी ट्रॉपिकल टायटन्सच्या संघाने कब्जा मिळवला. रोईंगमधील कौशल्य, संघातील शंभरावर खेळाडूंमध्ये असलेला अचूक समन्वय आणि सांघिक भावनेच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्धी नऊ संघांना धोबीपछाड दिली. कोल्लम येथील प्रेसिडेंट ट्रॉफी बोट रेसवर अंतिम सामन्याचा हा थरार पाहण्यासाठी केरळसह देश-विदेशातील हजारो बोटिंग रसिकांनी उपस्थिती लावली होती.
शनिवारी दुपारी २ च्या सुमारास पारंपरिक वांद्यांच्या गजरात आणि लोकनृत्याच्या साथीने या राष्ट्रपती करंडक बोट शर्यत आणि चॅम्पियन लीग बोटच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यासाठी बॅकवॉटर परिसरात सकाळपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आणि आवेश दिसून येत होता. स्पर्धेच्या प्रारंभापासूनच ट्रॉपिकल टायटन्सने आघाडी घेतली. अखेर सायंकाळच्या सुमारास अंतिम फेरीमध्ये ११६ गुणांची कमाई करत ट्रॉपिकलने मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या बोट लीग चषकावर विजयाची मोहर उमटविली. १०७ गुणांसह मायटी ओर्स द्वितीय स्थानावर तर ९२ गुण मिळवत रॅगिंग रॉवर्स संघाने तिसरा क्रमांक पटकावला.
शेती संस्कृतीच्या उत्सवाने पर्यटनाला चालना
केरळमधील बोटिंग स्पर्धा या केरळच्या शेती संस्कृतीचा अविभाज्य घटक मानला जातात. त्यामुळे पावसाळ्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी केरळच्या शांत बॅकवॉटरमध्ये उत्कंठा आणि आवेश निर्माण करणारी ही स्पर्धा भरते. या स्पर्धेमुळे केरळबरोबरच देश-विदेशातील पर्यटक खास चॅम्पियन बोट लीग पाहण्यासाठी केरळमध्ये दाखल झालेले असतात. शनिवारीही याचा प्रत्यय आला. प्रेसिडेंट बोट रेस क्लबसह परिसरातील बॅकवॉटरमध्ये रेसिंगच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.
राज्यात १२ ठिकाणी झाल्या स्पर्धा
मागील ६८ वर्षांपासून केरळमध्ये ही बोट रेस स्पर्धा घेतली जाते. मध्यंतरी कोरोनामुळे दोन वर्षे स्पर्धा होऊ शकली नाही. मात्र, यावर्षी प्रादुर्भाव कमी होताच ४ सप्टेंबर रोजी अल्लापुझ्झा येथून या बोट रेसला प्रारंभ झाला. राज्यातील वेगवेगळ्या १२ बॅकवॉटरमध्ये विविध फेऱ्या पार पडल्यानंतर शनिवारी कोल्लम येथे ही अंतिम स्पर्धा पार पडली. एकूण सात कोटींच्या बक्षिसांची रक्कम असलेल्या या स्पर्धेतील चॅम्पियन लीग विजेत्याला २५ लाख रुपये, उपविजेत्याला १५ लाख रुपये, तर तिसऱ्या क्रमांकावरील विजेत्याला १० लाखांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विविध फेरीतील विजेत्या संघांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.