मुंबई : स्टेडियमवर पुरस्कार स्वीकारताना डोळ्यांसमोर देशाचा तिरंगा वर जातो आणि जगासमोर राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’ची धून वाजली जाते. यासारखा आनंदाचा व रोमांचक अनुभव कोणत्याही खेळाडूच्या जीवनात नाही. केवळ खेळाडूच नाही, तर या अभिमानास्पद प्रसंगावेळी स्टेडियमवर उपस्थित आणि टीव्हीवरून हा सोहळा पाहणाऱ्या करोडो भारतीयांसाठी देखील तो क्षण गर्वाचा ठरतो. नेमका हाच अनुभव आणि तोच रोमांच सदैव भारतीयांना मिळावा यासाठी विविध खेळांतील नामवंत खेळाडू एकत्र आले असून सर्वांनी ‘द स्पोटर््स हिरोज’ या अंतर्गत राष्ट्रगीतवर एक खास व्हिडिओ तयार केला आहे. ज्यांच्या पुढाकाराने ही आगळीवेगळी मोहीम साकारली, ते भारताचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांनी याबाबत ‘लोकमत’ला माहिती दिली.मुळात ही संकल्पना पत्नी रसिका कुलकर्णीची असून आम्ही दोघांनी खेळाडूंशी याबाबत संपर्क केला. विशेष म्हणजे, प्रत्येकाने लगेच होकार दिल्याने सर्व काही सहज झाले. यासाठी आम्ही ६ ते ८ महिने आधी तयारी केली असून भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते या व्हिडिओचे २४ जानेवारीला मुंबईत अनावरण होेईल, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.या मोहिमेसाठी राष्ट्रगीतच का निवडले. या प्रश्नावर कुलकर्णी म्हणाले की, यंदाचे वर्ष आॅलिम्पिकचे असून यावर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा भारतात रंगणार आहे. शिवाय राष्ट्रगीत कोणत्याही जाती-धर्म, राज्य किंवा भाषिकांपुरते मर्यादित नसून सर्व भारतीयांसाठी आहे. राष्ट्रगीत ऐकताना सर्वांच्या अंगावर काटा येतो. शिवाय आजपर्यंत कधीही केवळ खेळाडूंचा सहभाग असलेला राष्ट्रगीतवरील आधारित व्हिडिओ तयार झालेला नसल्याने आम्ही राष्ट्रगीत थीम घेतली. यांचा असणार सहभागसहभागी खेळाडूंबाबत गुप्तता ठेवताना कुलकर्णी यांनी काही मोजक्या खेळाडूंची नावे जाहीर करत सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, धनराज पिल्ले, बायचुंग भुतिया यांचा सहभाग असल्याचे सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)
खेळाडू देणार देशवासीयांना रोमांचक अनुभव
By admin | Published: January 20, 2016 3:00 AM