अर्मेनियाचा स्टार फुटबॉलर आणि बलाढ्य जर्मन क्लब बोरिसिया डॉर्टमंडचा अव्वल खेळाडू हेन्रिक मिखितरायन याला जुलैमध्ये तब्बल ३० मिलियन युरोची घसघसीत किंमत देऊन मँचेस्टर युनायटेडने आपल्या संघात घेतले. हेन्रिककडून एमयूच्या पाठिराख्यांना मोठी अपेक्षा आहे. मात्र, अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला डिसेंबर अखेरपर्यंत वाट पहावी लागली. मात्र, तरी पुर्ण आत्मविश्वासाने सज्ज असलेला हेन्रिक आपण काय करु शकतो हे एमयू पाठिराख्यांना दाखविण्यास तयार झाला आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे निराशाजनक सुरुवात झाल्याने मॅनेजर जोस मुरिन्हो यांनी हेन्रिकडे दुर्लक्षचे केले. पण आता, ओल्ड ट्रॅफोर्डवर संडरलँडविरुध्द दोन हात करण्यास सज्ज असलेल्या एमयूसाठी हेन्रिक महत्वाचा खेळाडू बनला आहे. गेल्याच आठवड्यात युरोपा लीगमध्ये युक्रेनच्या झोऱ्या संघाविरुध्द संघाला बरोबरी साधून देण्यात निर्णायक कामगिरी करताना झळकावलेला गोल हेन्रिकचे महत्व सांगून गेला. त्यामुळे नवे वर्ष हेन्रिकचे असेल अशीच चर्चा एमयू पाठिराख्यांमध्ये सुरु आहे...आगामी वर्ष एमयूसाठी खूप मोठे आहे. ख्रिसमस सामना नेहमीच प्रीमियर लीगच्या गुणतालिकेवर मोठा परिणामकारक ठरला आहे? संडरलँडविरुद्धचा सामना किती महत्वाचा आहे?- येणारे वर्ष मँचेस्टर युनायटेडसाठी खूप चांगले ठरणारे असो, अशीच मी प्रार्थना करतो. येणारे सत्र आमच्यासाठी सकारात्मक ठरेल आणि सर्व स्पर्धांत विजयी ठरु अशीच आशा करतो. २०१७ साली आम्ही काही जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरु अशी अपेक्षा आहे.पण सध्या, एमयू इतर प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत विजेतेपदाच्या शर्यतीत खूप मागे आहे? प्रीमियर लीग विजेतेपद अजूनही तुमच्या अवाक्यात आहे असे वाटते का?- आम्ही अजून जेतेपदाच्या आशा सोडल्या नसल्याने आम्ही जेतेपदाच्या शर्यतीत नाही असे नाही. आम्ही अजूनही या शर्यतीत असून अजून खूप सामने खेळणे बाकी आहेत. खास करुन येणाऱ्या नव्या वर्षात. त्यामुळेच आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करुन अव्वल चार स्थानांसाठी प्रयत्न करु. शिवाय युरोपा लीगबाबत म्हणायचे झाल्यास, नक्कीच आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करुन आगेकूच करणार.खूप काळानंतर तू अंतिम संघात स्थान मिळवलेस. तुझे स्वत:चे लक्ष्य काय आहेत? - केवळ स्वत:चा सर्वोत्तम खेळ करणे आणि संघातील स्थान राखणे हेच माझे लक्ष्य आहे. प्रीमियर लीगचे सर्व सामने अंतिम सामन्यासारखे आहेत. शानदार खेळ करुन चाहत्यांना गर्व वाटेल अशी कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.जोस मुरिन्हो यांनी तुझी निवड करण्यासाठी तुला फार प्रतीक्षा करावी लागली. शिवाय जानेवारीमध्ये तुला संघातून रिलिज करण्याचे वृत्त होते. पण नंतर तू मोठा प्रभाव पाडलास. संघात संधी मिळणार नाही अशी भिती तुला कधी वाटली?- कधीच नाही. कारण मी माझा सर्वोत्तम कामगिरीसाठी नेहमी प्रयत्नशील होतो. संघातील जागा तुम्हाला मिळवावी लागते. किती किंमत मोजून संघाने सामिल केले याला काहीच महत्व नसते. खेळण्याची संधी मिळेल की नाही याची मला शाश्वती नव्हती. मी फक्त मेहनतीवर लक्ष केंद्रित केले आणि संघासाठी स्वत:ला झोकून दिले. युरोपा लीगमध्ये झळकावलेला पहिला गोल किती महत्वाचा होता? कारण यानंतर एमयू पाठिराख्यांनी तुला डोक्यावर घेतले.- हो खरं आहे. माझ्यामते पहिला गोल नेहमी तुमचे भार कमी करतो. मी या क्षणासाठी खूप प्रतीक्षा केली होती आणि माझा पुढचा गोल ओल्ड ट्रॅफोर्डवर दिसेल. मला घरच्या मैदानावर गोल करण्याची खूप उत्सुकता आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, या गोलमुळे आम्ही अजुनही स्पर्धेत असल्याचे सिध्द झाले. (पीएमजी/ईएसपी)
आगामी वर्ष यशस्वी ठरेल अशी अपेक्षा
By admin | Published: December 26, 2016 1:25 AM