नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत ऐतिहासिक सुवर्ण जिंकून देणारा भालाफेकपटू ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा याने कोचिंगसाठी २०१७ ला नियुक्त केलेले जर्मनीचे बहुचर्चित खेळाडू उवे हॉन यांची भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केली. अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनीच ही घोषणा केली.
महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांच्या मते, ‘नीरज उवे यांच्या कामगिरीवर समाधानी नव्हता. लवकरच नव्या दोन विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. ५९ वर्षांचे उवे हे १०० मीटरहून अधिक अंतरावर भालाफेक करणारे एकमेव खेळाडू आहेत.
नीरजने २०१८ च्या आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकले त्यावेळी उवे हेच त्याचे कोच होते. टोकियो ऑलिम्पिकसाठी त्यांची राष्ट्रीय भालाफेक कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली. दोन दिवसांच्या बैठकीत खेळाडू आणि कोचेसच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर सुमारीवाला पुढे म्हणाले, ‘उवे यांना पदावरून दूर करण्यात येत आहे. दुसरीकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजला कोचिंग देणारे बायोमेकॅनिकलतज्ज्ञ क्लॉस बार्टोनीज हे मात्र पदावर कायम असतील. एएफआयच्या योजना समितीचे प्रमुख ललित भानोत यांनी सांगितले की, ‘नीरज चोप्रा, शिवपालसिंग आणि अन्नू राणीसारखे भालाफेकपटू उवे यांच्यासोबत सराव करू इच्छित नव्हते. क्लॉस मात्र तज्ज्ञ कोच म्हणून कायम असतील. चांगले कोच मिळणे सोपे नसते. आम्ही मात्र चांगल्या कोचच्या प्रयत्नात आहोत.’ गोळाफेकपटू तेजिंदरसिंग तूर यांच्यासाठीदेखील नवे विदेशी कोच शोधण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सुमारीवाला यांनी दिली.
नीरजने उवे यांना दिले होते श्रेय
टोकियो ऑलिम्पिकआधी नीरजने क्लाॅस यांच्या मार्गदर्शनात सराव केला; पण सुवर्णपदक मिळताच नीरजने उवे यांच्यासोबत जो वेळ घालविला त्यामुळे हे यश मिळाल्याचे सांगितले होते. तो पुढे म्हणाला, ‘२०१८ ला मी त्यांच्याच मार्गदर्शनात आशियाई आणि राष्ट्रकुलचे सुवर्ण जिंकू शकलो. माझ्या मते उवे यांचे सरावकौशल्य आणि तंत्र थोडे वेगळे होते.’