वुहान : सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यासह भारतीय बॅडमिंटनपटू बुधवारपासून येथे सुरू होत असलेल्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मानांकन गुणांची कमाई करण्यावर भर देणार आहेत. कारण, आॅलिम्पिक पात्रता मिळवण्याचा कालावधी संपण्यापूर्वी ही अखेरची स्पर्धा आहे. टाचेच्या दुखापतीतून सावरल्यानंतर सायनाने स्विस ओपन, इंडिया ओपन आणि मलेशिया ओपन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठली होती; पण त्यानंतर सिंगापूर ओपन स्पर्धेतून तिने माघार घेतली होती. पाचवे मानांकनप्राप्त भारतीय खेळाडू आपल्या मोहिमेची सुरुवात इंडोनेशियाच्या फित्रियानी विरुद्धच्या लढतीने करणार आहे. जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेली बॅडमिंटनपटू सिंधूला अनेक स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही. सिंधू महिला एकेरीत बुधवारी इंडोनेशियाच्या मारिया फेबे कुसुमासतुतीच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. आॅगस्टमध्ये होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी प्रबळ दावेदार असलेला आणि क्रमवारीत १३ व्या क्रमांकावर असलेला भारतीय खेळाडू किदांबी श्रीकांत पुरुष एकेरीत पहिल्या फेरीतील पराभवाचे दुष्टचक्र भेदण्यास प्रयत्नशील आहे. गेल्या काही दिवसांपासून कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या श्रीकांतला इंडिया ओपन, मलेशिया ओपन, सिंगापूर ओपन आणि चीन ओपन स्पर्धांमध्ये पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. आशियाई स्पर्धेत कोरियाच्या ली डोंग क्यूनविरुद्ध श्रीकांत विजयाने सुरुवात करण्यास उत्सुक आहे. ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा या महिला दुहेरीच्या जोडीला सलामी लढतीत चांग ये ना व ली सो ही या कोरियाच्या जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मनी अत्री व बी सुमित रेड्डी या जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या पुरुष दुहेरीच्या जोडीला पहिल्या फेरीत जपानच्या हिरायुकी एंड व केनिची हयाकावा यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. प्रणय चोपडा व अक्षय देवाळकर यांची लढच चिन चुंग व टँग चुन मान या हाँगकाँगच्या जोडीसोबत होईल. पुरुष व महिला एकेरीत एकाच देशाच्या जास्तीत जास्त दोन खेळाडूंना संधी मिळू शकते; पण त्यांचा जागतिक क्रमवारीत अव्वल १६ खेळाडूंमध्ये समावेश असणे आवश्यक आहे. यामुळे निर्धारित खेळाडूंची निर्धारित संख्या पूर्ण होत नसेल तर ३८ खेळाडूंचा ड्रॉ पूर्ण करण्यासाठी प्रत्येक देशाला एक कोटा स्थान मिळेल. एकेरीचे नियम दुहेरीमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठीही लागू आहेत. (वृत्तसंस्था)
भारतीय खेळाडूंची नजर मानांकन गुणांवर
By admin | Published: April 27, 2016 5:35 AM