तेमुको : स्टार स्ट्रायकर पाओलो गुएरेरो याने केलेल्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर पेरु संघाने एकतर्फी झालेल्या सामन्यात बोलिविया संघाचा ३-१ असा धुव्वा उडवला आणि कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात त्यांची लढत पारंपारीक प्रतिस्पर्धी चिली विरुध्द होणार असल्याने हा सामना ‘हाय व्होल्टेज’ ठरेल.तीन गोल नोंदवून एकहाती वर्चस्व राखलेल्या गुएरेरो याने बोलिविया संघाच्या आव्हानातली हवाच काढली. बोलिवियाच्या गोलक्षेत्रात जोरदार मुसंडी मारताना त्याने प्रतिस्पर्धी संघाचा बचाव सहजपणे भेदला. सुरुवातीला सावधपणे खेळल्यानंतर गुएरेरोने आक्रमणाची सगळी सुत्रे आपल्याकडे ठेवताना अप्रतिम चाली रचल्या आणि २०व्या आणि २३व्या मिनिटाला गोल करुन पेरु संघाला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.मध्यंतराला हीच आघाडी कायम ठेवल्यानंटर पेरुने चेंडुवर सर्वाधिक वेळ नियंत्रण राखताना बोलिवियाला दडपणाखाली ठेवले. त्यातच पुन्हा एकदा गुएरेरोने आपला जलवा दाखवताना ७४व्या मिनिटाला आणखी एक वेगवान गोल नोंदवून पेरुच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याचवेळी सामना संपण्यास काही मिनिटांचा वेळ असताना मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरची संधी साधून मार्सेलो मार्टिन्सने बोलिविया संघाचा एकमेव गोल नोंदवला. या सामन्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहेत ते पेरु वि. चिली या ‘हायव्होल्टेज’ सामन्याकडे. १९३५ सालापासून सुरु झालेल्या या दोन संघातील चुरस या सामन्यात देखील पाहायला मिळेल यात शंका नाही. या दोन शेजारी देशांमध्ये होणाऱ्या सामन्यांना ‘क्लासिको डेल पैसिफिको’ या नावाने ओळखले जाते. (वृत्तसंस्था)
पाओलो गुएरेरोची शानदार हॅट्ट्रिक
By admin | Published: June 27, 2015 12:48 AM