नवी दिल्ली : मनोज तिवारीने केलेल्या ४५ चेंडूतील ६० धावांच्या झुंजार खेळीनंतरही रायझिंग पुणे सुपरजायंट्सला चुरशीच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध ७ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. दिल्लीने प्रथम ८ बाद १६८ धावांची मजल मारल्यानंतर पुणेकरांना ७ बाद १६१ धावांची मजल मारता आली. पुण्याला आता दुसरे स्थान निश्चित करण्यासाठी आपल्या अखेरच्या सामन्यात पंजाबला नमवणे आवश्यक आहे. तसेच कोलकाता मुंबईविरुध्द पराभूत होणे देखील पुणेकरांसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पुणेकरांची अडखळती सुरुवात झाली. पहिल्याच चेंडूवर झहीर खानने अजिंक्य रहाणेचा त्रिफळा उडवून पुण्याला जबर धक्का दिला. यानंतर, राहुल त्रिपाठी (७), स्टिव्ह स्मिथ (३८) आणि बेन स्टोक्स (३३) फारशी चमक न दाखवताना बाद झाले. महेंद्रसिंग धोनीही केवळ ५ धावांवर परतला. परंतु, एक बाजू लावून धरलेल्या मनोज तिवारीने पुण्याच्या आशा अखेरपर्यंत उंचावताना दिल्लीवर दडपण ठेवले. अखेरच्या षटकात २५ धावांची आवश्यकता असताना तिवारीने पॅट कमिन्सच्या पहिल्या दोन चेंडूवर षटकार ठोकले. यावेळी दडपणाखाली आलेल्या कमिन्सने वाइड चेंडू टाकल्याने पुणेकरांमध्ये उत्साह संचारला. तिवारी सनसनाटी विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच कमिन्सने शानदार पुनरागमन करुन सलग दोन चेंडू निर्धाव टाकले. अखेरच्या दोन चेंडूत १२ धावांची गरज असताना पुण्याला लेग बायच्या ४ धावा मिळाल्या, तर अखेरच्या चेंडूवर तिवारीचा त्रिफळा उडवून कमिन्सने दिल्लीला विजयी केले. तिवारीने ४५ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह ६० धावांची झुंजार खेळी केली. तत्पूर्वी करुण नायर, रिषभ पंत आणि मार्लन सॅम्युअल्सच्या जोरावर दिल्लीने समाधानकारक मजल मारली. दिल्लीचीही अडखळती सुरुवात झाल्यानंतर करुणने संघाला सावरताना ४५ चेंडूत ९ चौकारांसह ६४ धावा केल्या. रिषभ पंत (२२ चेंडूत ३६) आणि सॅम्युअल्स (२१ चेंडूत २७) यांनी मोक्याच्यावेळी फटकेबाजी करत संघाला दिडशेचा पल्ला पार करुन देण्यात मोलाचे योगदान दिले. (वृत्तसंस्था)दिल्लीडेअरडेव्हिल्स२० षटकात ८ बाद १६८ धावा (करुण नायर ६४, रिषभ पंत ३६; जयदेव उनाडकट २/२९, बेन स्टोक्स २/३१) वि.वि.रायझिंग पुणे सुपरजायंट्स :२० षटकात ७ बाद १६१ धावा (मनोज तिवारी ६०, स्टिव्ह स्मिथ ३८; झहीर २/२५, मोहम्मद सामी २/३७)
दिल्ली जिंकण्यात पुण्याला अपयश, मनोज तिवारीची अपयशी झुंज
By admin | Published: May 13, 2017 2:08 AM