शिलाँग : प्रशासकीय अव्यवस्थेमुळे मुष्टियोद्ध्यांचे भविष्य अंधकारमय झाले असून,असेच सुरू राहिल्यास हा खेळ केवळ टाइमपास म्हणून खेळला जाईल, असा संताप विश्वविजेती मुष्टियोद्धा मेरी कोमने व्यक्त केला. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा संघाने भारतीय बॉक्सिंग महासंघावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने, राष्ट्रीय पातळीवर कोणतीच संघटना नाही. सध्या एका समितीच्या माध्यमातून महासंघाचे कामकाज पाहिले जात आहे. या विषयी बोलताना कोम म्हणाली, ‘मुष्टियोद्ध्यांसमोर कोणतीही प्रेरणा राहिली नाही, ही परिस्थिती निराशाजनक आहे. त्यामुळे खेळासाठी काही प्रयत्न केल्यास त्याचा कोणताच फायदा खेळाडूला होत नाही. त्यामुळे मुष्टियोद्ध्यांचे भविष्य अंधारात असल्याचे वाटते. जर कोणतीही राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही, तर भविष्यात या खेळासाठी खेळाडूच उपलब्ध होणार नाहीत. वरिष्ठ खेळाडू सध्या दक्षिण आशियाई स्पर्धा खेळत आहेत. त्यानंतर पुढील वर्षी आॅलिम्पिक पात्रता फेरी होईल. त्यामुळे तरी खेळाडू कठोर मेहनत करीत आहेत, अन्यथा मुष्टियुद्ध केवळ टाइमपास म्हणूनच खेळला जाईल.’ असे असले तरी हा खेळ संपणार नाही. मुष्टियोद्धा हा खेळ नक्कीच सोडणार नाहीत. मात्र, खेळामुळे त्यांच्या घराला हातभार मिळाला, तर खेळाडूंसाठी ते उपयोगी ठरेल, असे मत कोमने व्यक्त केले.
मुष्टियोद्ध्यांचे भविष्य अंधारात - मेरी कोम
By admin | Published: February 16, 2016 3:32 AM