- स्वदेश घाणेकर
स्वप्नांचा पाठलाग करणे कधी सोडायचं नाही... घरची परिस्थिती, समाज आपल्याला आपल्या स्वप्नांपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो, पण खचून न जाता पुढे चालतंच राहायचं... स्वप्न पूर्ण होतात... हे आतापर्यंत आपण अनेक दिग्गज खेळाडूंच्या तोंडून ऐकलं आहे. आज अशाच एका ध्येयवेड्या खेळाडूची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत. तो आज मोठा स्टार नाही, पण भविष्यात त्याचे नाव स्टार म्हणून नक्की घेतले जाईल, याची खात्री आहे. नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडाखुर्द गावातला हा कबड्डीपटू आज सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये ( Pro Kabaddi League) जयपूर पिंक पँथर्स ( Jaipur Pink Panthers) संघाने राहुल धनवडेला १० लाखांची बोली लावून महाराष्ट्राच्या युवा खेळाडूला करारबद्ध केले अन् त्याच्या आनंदासमोर गगनही ठेंगणे वाटू लागले.
वडील अपंग आहेत, शेतीपण नाही, आई दुसऱ्यांच्या शेतात खुरपायला ( मजुरीला) जाते, राहुल कारखान्यात काम करतो, आई आणि राहुलने मिळून दोन बहिणींचं लग्न करून दिलं. राहुलने शाळा बाहेरून पूर्ण केली. शेतीच नाही म्हणून आई अजूनही खुरपायला जाते. ''परिस्थितीला लाजत नाही. मेहनत करत राहायची. कधी ना कधी यश मिळेलच. आमच्या नगर जिल्ह्यानेही खूप सपोर्ट केला. सातत्यपूर्ण खेळ करत राहिल्याने सर्वांचे लक्ष गेले,''असे राहुल सांगतो.
राहुल दिवाळीत कारखान्यात काम करायचो. सतत स्पर्धा खेळून त्यातून मिळणाऱ्या पैशातून तो घर चालवतो. लॉक डाऊनमध्ये वॉर्डबॉय म्हणून कामही त्यानं केलं. राहुलच्या घरी लाईटही नाही. त्याने सांगितले,''१० लाखांची बोली लागल्याचं कळाल्यानंतर आई-वडील आनंदाने रडू लागले. ते बोलत होते कबड्डी सोडून दे, हाता-पायाला मार लागून येतोस. हा मोठ्या लोकांचा खेळ आहे, आपली परिस्थिती नाही बाळ. तू समजून घे, लोकं नाव ठेवतात; पण मी बोललो, नाद लागलं तर सुटना, दुसरं तर काम माझ्याकडून होऊ शकत नाही.''
या वर्षी सोडणार होता कबड्डी, पण...प्रयत्न करूनही पदरी अपयश येत असल्याने राहुलने कबड्डी खेळण्याचं हे शेवटचं वर्ष असं ठरवून नोकरीची शोधाशोध सुरू केली होती. पण, नशिबाने कलाटणी मारली, मेहनतीचं चीज झालं. ''आपण काहीतरी पाप केलेत त्याचे फळ भोगतोय. समाजच गरीब आहे आणि त्यामुळे कुणी सपोर्ट करायचं नाही. त्यामुळे मीही खचलो होतो. त्यामुळे हे वर्ष कबड्डी खेळण्याचं शेवटचं असं ठरवलं होतं. पण, नशीब पालटलं. ज्यांनी माझ्यासाठी शब्द टाकला, धावपळ केली आता त्यांच्यासाठी कबड्डी खेळत राहणार. प्रो कबड्डीसाठी निवड होईल असं वाटलंही नव्हतं. महाराष्ट्राचा दोन वेळा कॅम्प केला, त्यामुळे प्रो कबड्डीची आशा मी केली नव्हती. मित्रांने मला कॉल करून सिलेक्शन झाल्याचे सांगितले.''
१० लाखांचं काय करणार?मला दुखापत झाली होती... MRI काढायलाही पैसे नव्हते... ६ महिने मी कबड्डी खेळलो नव्हतो.. जी पोरं फिजिओकडे जायची त्यांच्याकडून माहीती घेत मी तसा व्यायाम घरच्या घरी केला अन् दुखापतीतून सावरलो. माझे स्वप्न मधी भरकट्यागत झालं होतं, कारण मी काम करायचो ना.. माझी परिस्थिती इतकी बेकार आहे ना सर की सांगायलाही लाज वाटतेय. बक्षीस रक्कमेतून पहिल्यांदा घर बांधायचे आहेत. ते बांधून झाल्यावर पुढचं पाऊल टाकणार., स्वप्न तर खुप मोठाले आहेत, पण डायरेक्ट बोलून नाही दाखवणार.