कोलकाता : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हेप्टाथलॉन प्रकारात विक्रमी सुवर्ण जिंकताच स्वप्ना बर्मनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अनोळखी खेळाडू स्टार बनली आहे. चाहत्यांच्या तिच्याकडून अपेक्षा देखील वाढल्या. या अपेक्षांच्या ओझ्यामुळे अनेकदा ‘नर्व्हसनेस’ येतो, शिवाय भीतीही वाटते, अशी प्रतिक्रिया स्वप्नाने व्यक्त केली.
आशियाई स्पर्धेआधी जलपाईगुडीच्या स्वप्नाला फार कमी लोक ओळखायचे. आॅगस्ट महिन्यात जकार्ता येथे सुवर्ण जिंकताच रात्रभरात ती स्टार बनली. एका वाहिनीवरील कार्यक्रमात ती म्हणाली, ‘आयुष्य बदलले पण मी मात्र आहे तेथेच आहे. लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. चाहत्यांचा आदर आणि अपेक्षा पाहून मी स्वप्न तर बघत नाही ना, असा विचार मनात डोकावतो.’ आधी माझे आईवडील आणि कोच माझ्याकडून जिंकण्याची तसेच चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगायचे. आता देशातील नागरिक माझ्याकडून आॅलिम्पिक पदकाची अपेक्षा बाळगून आहेत. अपेक्षांच्याया ओझ्यामुळे मी नर्व्हस होते. मी चांगली कामगिरी करू शकले नाही तर काय होईल, असा विचार आला की भीतीही वाटत असल्याचे स्वप्नाने सांगितले. आॅलिम्पिक पदक अशक्य नाहीस्वप्नाने आशियाई स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरीसह ६०२६ गुण संपादन केले. तथापि आॅलिम्पिक पदक जिंकण्यासाठी तिला ६७०० गुणाची नोंद करावी लागणार आहे. ही कठीण बाब असली तरी अशक्य नाही. २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकमध्ये पात्रतेसाठी ६२०० गुणांची अट ठेवण्यात आली होती.