न्यूयॉर्क : दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर आणि ६ वर्षांत प्रथमच अमेरिकन ओपनच्या पुरुष एकेरीच्या निर्णायक लढतीसाठी सज्ज असलेला नोवाक जोकोविच यांच्यात रविवारी अंतिम सामना खेळला जाईल.अमेरिकन ओपनमध्ये १९७०नंतर जेतेपद मिळविणारा सर्वाधिक वयाचा खेळाडू बनण्यासाठी पाच वेळेचा चॅम्पियन ३४ वर्षांच्या फेडररने सेमीफायनलमध्ये आपलाच सहकारी स्टेन वावरिन्का याला ६-४, ६-३, ६-१ ने पराभूत केले होते. २०११ चा विजेता जोकोविचने सहाव्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक दिली. सर्बियाच्या या खेळाडूने गतविजेता मारिन सिलिचवर विक्रमी ६-०, ६-१, ६-२ ने विजय साजरा केला. हा सर्वांत मोठा एकतर्फी विजय ठरला होता. उद्या होणारी अंतिम लढत ही जुलै महिन्यात झालेल्या विम्बल्डन स्पर्धेतील अंतिम सामन्याला उजाळा देणारी ठरावी. जोकोविचने त्या वेळी करिअरमधील नववे ग्रॅण्डस्लॅम जिंकले होते. फायनलची जोकोविच आणि फेडरर यांच्यातील ४२वी लढत असेल. यांपैकी फेडररने जोकोविचला २१ वेळा हरविले, तर २० वेळा तो स्वत: पराभूत झाला. आॅगस्ट महिन्यात सिनसिनाटी ओपनमध्ये एकतर्फी अंतिम सामन्यात फेडररने बाजी मारली होती. सातव्यांदा अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठणाऱ्या फेडररने यंदा सलग २८ सेट जिंकले आहेत. २००५मध्ये आंद्रे आगासी याने ३५व्या वर्षी अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर ३४ वर्षांचा फेडरर हा सर्वांत प्रौढ खेळाडू ठरतो. फेडरर यंदा सहाव्यांदा जोकोविचविरुद्ध खेळेल. यापूर्वी पाचही वेळा दोन्ही स्टार अंतिम फेरीतच एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. जोकोविचने यंदाच्या सर्व चारही ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत धडक दिली असली, तरी आॅस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनचे जेतेपद वगळता फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात त्याला वावरिन्काकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. (वृत्तसंस्था)
फेडरर-जोको अंतिम लढत
By admin | Published: September 13, 2015 4:15 AM