लंडन : अग्रमानांकित सर्बियाचा नोव्हाक जोकोविच, जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर आणि तिसरा मानांकित इंग्लंडचा अॅँडी मरे यांनी प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली. पुरुष एकेरीच्या आठव्या विजेतेपदाच्या इराद्याने खेळत असलेल्या ३३ वर्षीय रॉजर फेडररने फ्रान्सच्या १२ व्या मानांकित जी. सिमोन्सवर ६-३, ७-५, ६-२ अशी मात केली. तर दुसरीकडे, पावसाच्या ‘ब्रेक’मध्ये अडकलेल्या सामन्यात यजमान देशाचा अॅँडी मरे याने कॅनडाचा व्ही. पोसपिसील याचा दोन तास १२ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-४, ७-५, ६-४ अशा सेटमध्ये एकतर्फी पराभव केला. पहिल्या कोर्टवर रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात रॉजर फेडररने सिमोन्सवर वर्चस्व राखले. त्याने पहिला सेट६-३ असा आरामात जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सिमोन्सने पुनरागमनासाठी प्रयत्न केला. या सेटमध्ये त्याने २५ पॉइंट जिंकले, तर तर फेडररने ३३ पॉइंट जिंकले. तिसऱ्या सेटमध्ये मात्र फेडररने सिमोन्सला संधीच दिली नाही. त्याने हा सेट ६-२ ने आरामात जिंकून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने क्रोएशियाच्या मरिन सिलिकला ६-४,६-४,६-४ असे एक तास ४९ मिनिटांत नमविले. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत रॉजर फेडरर व अॅन्डी मरे यांच्यात लढत होणार आहे. नोव्हाक जोकोविचची उपांत्य फेरीतील लढत स्टॅन वावरिन्का व रिचर्ड गॅस्केट यांच्यातील विजेत्याविरुद्ध होईल.(वृत्तसंस्था)
फेडरर, मरे, जोकोविच सेमीमध्ये
By admin | Published: July 09, 2015 1:18 AM