लंडन : दिग्गज टेनिसपटू स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने एकतर्फी झालेल्या सामन्यात सहज बाजी मारताना कारकिर्दीत तब्बल १२व्यांदा विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित ब्रिटनच्या अँडी मरेने दमदार विजयासह सलग दहाव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला गटात स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझाने सनसनाटी विजय मिळताना अव्वल मानांकित अँजोलिक केर्बरला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्वेतलाना कुझनेत्सोवाने अग्निएस्झका रॅडवान्सका हिला सरळ दोन सेटमध्ये नमवले. दिग्गज व्हिनस विलियम्सने दहाव्यांदा विम्बल्डन उपांत्यपूर्व फेरी गाठली.संभाव्य विजेत्या फेडररने नियंत्रित खेळ करताना बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवला ६-४, ६-२, ६-४ असे सहज नमवले. दिमित्रोवने काही वेगवान सर्विस आणि जोरदार फटक्यांच्या जोरावर कसलेल्या फेडररपुढे क्वचितच आव्हान उभे केले. त्याच वेळी, मरेला फ्रान्सच्या बेनॉइट पेरविरुद्ध विजयासाठी पहिल्या सेटमध्ये काहीसे झुंजावे लागले. मात्र, जम बसल्यानंतर मरेने उत्कृष्ट खेळ करताना बेनॉइटचे आव्हान ७-६(७-१), ६-४, ६-४ असे परतावले. महिलांमध्ये मुगुरुझाने पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले. केर्बरच्या आक्रमक खेळाचे कोणतेही दडपण न घेता तिने अखेरच दोन सेट जिंकताना ४-६, ६-४, ६-४ अशी बाजी मारली. यासह मुगुरुझाने पहिल्यांदाच विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रशियाच्या अनुभवी कुझनेत्सोवाने पोलंडच्या रॅडवान्सकाचा ६-२, ६-४ असा धुव्वा उडवत चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पाच वेळची विजेती अमेरिकेची दिग्गज व्हिनस विलियम्सने क्रोएशियाच्या युवा अॅना कोंजुह हिचा ६-३, ६-२ असा फडशा पाडला. ब्रिटनच्या जोहाना कोंटाने पहिल्यांदाच विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठताना फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाला ७-६(७-३), ४-६, ६-४ असे नमवले.(वृत्तसंस्था)सानिया पराभूत...कर्स्टन फ्लिपकेन्ससह खेळत असलेल्या सानिया मिर्झाचे महिला दुहेरीत आव्हान संपुष्टात आले. सानिया - कर्स्टन यांना मार्टिना हिंगिस - युंग जान चेन यांच्याविरुध्द २-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला.ज्यूनिअर गटात मुलांमध्ये भारताचा सिध्दांत बांठिया पहिल्याच फेरीत फ्रान्सच्या माटेओ मार्टिन्यूविरुद्ध ६-३, २-६, ५-७ असा पराभूत झाला. मुलींमध्ये महक जैनने क्रोएशियाच्या लिया बोसकोविचला ७-६, ४-६, ६-४ असे नमवून विजयी सलामी दिली.
फेडरर, मरे उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: July 11, 2017 2:07 AM