ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १४ - सात वेळा विम्बल्डनचे विजेतेपदे पटकावणारा महान टेनिसपटू रॉजर फेडररने दिमाखात विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत फेडररने झेकोस्लोव्हाकियाच्या थॉमस बर्डिचवर ७-६, ७-६, ६-४ अशी सरळ सेटममध्ये मात करत अकराव्यांदा विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली. त्याबरोबरच ३५ वर्षीय फेडरर हा विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा गेल्या ४३ वर्षांतील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
विम्बल्डनच्या हिरवळीवर नेहमीच बहारदार खेळ करणाऱ्या फेडररने यंदाही जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले आहे. यावर्षी त्याने एकही सेट न गमावता विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे. दरम्यान आज थॉमस बर्डिचविरुद्ध झालेल्या उपांत्य लढतीतही फेडररने जबरदस्त खेळ केला. या लढतीत बर्डिचने पहिल्या दोन सेटमध्ये फेडररला कडवी टक्कर दिली. मात्र बर्डिचची झुंज मोडीत काढत फेडररने हे सेट ७-६, ७-६ असे जिंकत आघाडी घेतली. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये फेडररे बर्डिचवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत सेट ६-४ ने जिंकून सामना सरळ सेटमध्ये खिशात घातला. आता अंतिम लढतीत फेडररची गाठ मारिन सिलिकशी पडणार आहे.
Roger Federer beats Tomas Berdych by 7-6, 7-6, 6-4 in the 2nd semi-finals of #Wimbledon, to face Marin Cilic in the finals. pic.twitter.com/s0IH0D9V0b— ANI (@ANI_news) July 14, 2017