खेळाडू रॉजर फेडरर, गत चॅम्पियन नोवाक जोकोविच, अव्वल टेनिसपटू अमेरिकेची सेरेना विल्यम्स, रशियन टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हा यांनी एकेरी गटात प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारत आॅस्ट्रेलियन ओपनची तिसरी फेरी गाठली, तर दुहेरीत भारताच्या महेश भूपतीने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला; मात्र पेसला पहिल्या फेरीचा अडथळा दूर करता आला नाही. अनुभवी रॉजर फेडररने पुरुष गटातील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात युक्रेनच्या एलेक्झांद्र दोगोपोलोव्ह याच्यावर ६-३, ७-५, ६-१ अशा फरकाने मात केली. ३४ वर्षीय फेडररला पहिल्या दोन्ही सेटमध्ये विजय मिळविण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले; मात्र तिसऱ्या आणि अखेरच्या लढतीत त्याने दोगोपोलोव्हचे आव्हान मोडीत काढत पुढच्या फेरीत जागा पक्की केली. महिला गटात पाचवे मानांकन प्राप्त रशियाच्या मारिया शारापोव्हा हिने दुखापतग्रस्त असतानाही बेलारूसच्या एलिक्झांद्रा सास्त्रोविचला ६-२, ६-१ अशा फरकाने सहज पराभूत केले. विजयानंतर मारिया म्हणाली, दुखापतग्रस्त असूनही स्पर्धेत सलग दोन विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावला आहे. आता पुढच्या लढतीतही विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहीन. पुरुष गटातील अन्य लढतीत सहावे मानांकन प्राप्त झेक प्रजासत्ताकचा टॉमस बर्डिच, सातवे मानांकन प्राप्त जपानचा केई निशिकोरी आणि १५वे मानांकन प्राप्त बेल्जियमचा डेव्हिड गॉफिन याने आपापल्या गटात विजय मिळवून स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीचे तिकीट पक्के केले. पहिल्या फेरीत भारताच्या युकी भांबरीवर मात करणाऱ्या बर्डिचने दुसऱ्या फेरीत बोस्नियाच्या मिर्जा बेसिकचा ६-४, ६-०, ६-३ असा फडशा पाडला, तर निशिकोरी याने अमेरिकेच्या आॅस्टीन क्राजिसेकविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत ६-३, ७-६, ६-३ असा विजय मिळवीत तिसरी फेरी गाठली. गॉफिन याने बोस्नियाच्या दामिर जुम्हूरवर ६-४, ०-६, ६-४, ६-२ अशी सरशी साधली, तर १९ वे मानांकन प्राप्त आॅस्ट्रियाच्या डोमिनिक थिएम याने स्पेनच्या निकोलस एल्मार्गोला ६-३, ६-१,६-३ ने पराभूत केले. महिला गटातील लढतीत १२ वे मानांकन प्राप्त स्वीत्झर्लंडच्या बेलिडा बेन्सिक हिने हंगेरीच्या टिमिया बोबोसवर ६-३, ६-३ असा सहज विजय मिळविला. इटलीच्या रॉबर्टा विंची हिने अमेरिकेच्या इरिना फाल्कोनीवर ६-२, ६-३ ने वर्चस्व गाजवताना पुढच्या फेरीत प्रवेश निश्चित केला.आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील दुहेरी लढतीत भारताच्या महेश भूपतीने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला; मात्र अनुभवी लिएंडर पेसला पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. लॅक्झमबर्गच्या जाईल्स मुलेरसह खेळणाऱ्या भूपतीने स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या लढतीत आॅस्ट्रेलियाचा एलेक्स बोल्ट आणि अँड्र्यू विटिंग्टन या जोडीवर ७-६, ३-६, ६-४ असा विजय मिळविला. २ तास १३ मिनिटे चाललेल्या या सामन्यात भूपती-मुलेरने १२ ब्रेक पॉइंट वाचविले. दुसऱ्या दुहेरी लढतीत भारताचा पेस आणि फ्रान्सचा जेरेमी चारडी या जोडीला कोलंबियाच्या जुआन सेबेस्टियन काबाल आणि रॉबर्ट फाराहकडून पराभवाची नामुष्की ओढावली.
फेडरर, सेरेना, शारापोव्हा तिसऱ्या फेरीतमेलबोर्न : स्वीत्झर्लंडचा स्टार
By admin | Published: January 21, 2016 3:28 AM