मेलबोर्न : ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळविल्यामुळे स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर आणि रशियन सुंदरी मारिया शारापोव्हा यांचा आत्मविश्वास उंचावला आहे़ याच बळावर पुढील आठवड्यात होणाऱ्या आॅस्ट्रेलियन ओपनचे अजिंक्यपद मिळविणे हे त्यांचे लक्ष्य असेल. सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा स्टेनिसलास वावरिन्का यांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल़फेडररने रविवारी ब्रिस्बेन इंटरनॅशनलच्या फायनलमध्ये कॅनडाच्या मिलोस राओनिकला धूळ चारून जेतेपद मिळविले होते़ हा त्याचा हजारावा विजय होता़ याच कामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास उंचावला आहे़ त्यामुळे हा खेळाडू आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये नोव्हाक जोकोविच आणि राफेल नदाल यांचे आव्हान सहज मोडून काढेल, अशी शक्यता आहे़ स्पेनचा अनुभवी टेनिसपटू नदाल याने दुखापतीनंतर कोर्टवर कमबॅक केल होते़ मात्र, त्याला दोहा येथील पहिल्याच सामन्यात जर्मनीचा क्वालिफायर मायकल बेरर याच्याकडून मात खावी लागली होती़ त्यामुळे आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याच्याकडून विशेष कामगिरीची अपेक्षा नाही़ मात्र, नोव्हाक जोकोविच, ब्रिटनचा अँडी मरे, राओनिक आणि जपानचा केई निशिकोरी या खेळाडूंमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता आहे़मारिया शारोपोव्हा हिने ब्रिस्बेन इंटरनॅशनलच्या फायनलमध्ये अॅना इवानोविचवर मात करून जेतेपदाला गवसणी घातली होती़ तिचा हा कारकिर्दीतला ३४वा किताब होता़ मारिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे़ आॅस्ट्रेलियन ओपनमध्येही फॉर्म कायम राखून अजिंक्यपद मिळविण्यासाठी ती आतुर आहे़अमेरिकेची सेरेना विल्यम्स या स्पर्धेत सहाव्यांदा किताब आपल्या नावे करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल़ मात्र, पर्थमध्ये झालेल्या होपमन चषकात तिला लौकिकास साजेसा खेळ करता आला नव्हता़ महिला गटात शारापोव्हा, सेरेना यांच्याव्यतिरिक्त अॅना इवानोविच, सिमोना हालेप, एग्निस्ज्का रंदावास्का, आपले नशीब अजमावीत आहेत़ (वृत्तसंस्था)
फेडरर, शारापोव्हाचे लक्ष्य अजिंक्यपद
By admin | Published: January 15, 2015 3:09 AM