न्यूयॉर्क : स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि फ्रेंच ओपन चॅम्पियन असलेला पाचवा मानांकित स्टेनिसलास वावरिन्का यांनी आपापले सामने जिंकून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. अंतिम लढतीपूर्वी या दोन्ही सहकाऱ्यांमध्ये होणारा उपांत्य सामना लक्षवेधी ठरेल. दुसरा मानांकित फेडररने उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सचा रिचर्ड गास्के याचा तीन सेटमध्ये ६-३, ६-३, ६-१ ने ८७ मिनिटांत पराभव केला. वावरिन्काने १५वा मानांकित दक्षिण आफ्रिकेचा केविन अँडरसन याला ६-४, ६-४, ६-० ने नमविले. महिला एकेरीत दुसरी मानांकित रुमानियाची सिमोन हालेप हिने २०वी मानांकित बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेन्का हिच्यावर ६-३, ४-६, ६-४ ने विजय साजरा केला. हालेपचा सामना इटलीची फ्लाव्हेया पेनेटाविरुद्ध होईल. २६व्या मानांकित पेनेटाने पाचवी सीड पेट्रा क्विटोवाला धूळ चारली. झेक प्रजासत्ताकाची क्विटोवा पेनेटाकडून ४-६, ६-४, ६-२ अशी पराभूत झाली. यासोबतच दोन्ही गटांतील उपांत्य सामने निश्चित झाले.महिलांमध्ये अव्वल मानांकित अमेरिकेची सेरेना विल्यम्स इटलीची रॉबर्टा विन्सीविरुद्ध आणि पेनेटाविरुद्ध हालेप अशा लढती रंगतील. पुरुष गटात अव्वल मानांकित सर्बियाचा नोवाक जोकोविच हा गत चॅम्पियन मारिन सिलिचविरुद्ध पहिल्या उपांत्य सामन्यात लढत देईल. दुसरा उपांत्य सामना फेडरर-वावरिन्का यांच्यात खेळला जाईल. (वृत्तसंस्था)
फेडरर, वावरिन्का सेमीफायनलमध्ये
By admin | Published: September 11, 2015 4:28 AM