ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग नेहमीच हटके ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. कधी क्रिकेटपटू, कधी पाकिस्तान यांना आपल्या ट्विटमधून चिमटे काढणाऱ्या वीरूने आता विम्बल्डनविजेत्या रॉजर फेडररच्या गो प्रेमाचा शोध लावला आहे.
आता स्वित्झर्लंडमध्ये राहणारा फेडरर आणि गो प्रेम यांचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. त्याचे उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला वीरूने शेअर केलेले फेडररचे फोटो पाहावे लागतील. विक्रमी आठव्यांदा विम्बल्डनच्या विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या फेडररचे वीरूने ट्विटरवर तीन फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे गाय आणि फेडरर. महान टेनिसपटू रॉजर फेडररचे गो प्रेम पाहून चांगले वाटले, असे या फोटोंवर प्रतिक्रिया देताना वीरूने म्हटले आहे.
यातील पहिल्या फोटोमध्ये फेरडर गाईचे दूध काढताना दिसत आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात फेडरर आणि गाय टेनिस कोर्टवर दिसत आहेत.गाय भारतात राजकीयदृष्टा संवेदनशील प्राणी बनला आहे. कथित गौरक्षकांकडून गाईच्या रक्षणाच्या नावाखाली मारहाणीच्या घटनाही घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वीरूने ट्विट केलेले फोटे चर्चेचा विषय ठरले आहेत.
Cow love of the legend Roger Federer. So wonderful to see. pic.twitter.com/Yk7NWuuM4W— Virender Sehwag (@virendersehwag) July 18, 2017
नुकत्याच आटोपलेल्या विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत मारिन सिलिचवर 6-3, 6-1, 6-4 अशी सरळ सेटमध्ये मात करत फेडररने विक्रमी आठव्यांदा विम्बल्डनच्या विजेतेपदाला गवसणी घातली होती. फेडररचे हे कारकिर्दीतील 19 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले होते. त्याबरोबरच आठ वेळा विम्बल्डनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला टेनिसपटू ठरला. याआधी विल्यम रेनेश़ॉ आणि पीट संप्रास यांनी प्रत्येकी सात वेळा विम्बल्डनच्या विजेतेपदांना गवसणी घातली होती.