ऑनलाइन लोकमत
मेलबर्नं, दि. 29 - महान टेनिसपटू रॉजर फेडररने आज ग्रँडस्लॅम स्पर्धांमधील आपल्या विजेतेपदांचा अठरावा अध्याय लिहिला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत फेडररने फिटनेस आणि खेळातील सौंदर्याचा अद्भूत मिलाफ घडवत राफेल नदालवर 6-4, 3-6, 6-1, 3-6, 6-3 अशी मात केली आणि ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले.
फेडररचे या स्पर्धेतील हे पाचवे आणि कारकिर्दीतील 18 वे ग्रँडस्लॅंम विजेतेपद ठरले. उल्लेखनीय म्हणजे फेडररने 2010 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनचे आणि 2012 नंतर प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. याआधी फेडररने 2012 साली विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर मात्र तब्बल साडेचार वर्षे अनेकवेळा ग्रॅँडस्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठूनही त्याला विजेतेपद पटकावता आले नव्हते. अखेर आज त्याने नदालला नमवत ग्रँडस्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा संपुष्टात आणली.
टेनिसच्या पुरुष एकेरीमधील दोन दिग्गज असलेल्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यातील अंतिम लढत तब्बल तीन तास 38 मिनिटे रंगली. त्यांच्यातील धडाकेबाज खेळ पाहताना कोर्टवर उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांबरोबरच आजी-माजी टेनिसपटूंच्याही काळजाचा ठेका चुकत होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत फेडररने दमदार सुरुवात करताना पहिला सेट 6-4 अशा फरकाने जिंकला. मात्र नदालने दुसऱ्या सेटमध्ये 6-3 ने बाजी मारत सामन्यात कमबॅक केले. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये फेडररने पुन्हा आपला खेळ उंचावताना हा सेट 6-1 ने जिंकला. मात्र चौथ्या सेटमध्ये नदालने फेडररला मात देत या सेटवर 6-3 ने कब्जा केला. त्यानंतर पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये फेडररने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन घडवले. त्याने या सेटमध्ये नदालने घेतलेली आघाडी मोडून काढत जोरदार मुसंडी मारली आणि सेट 6-3 ने जिंकत सेटसह ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावर कब्जा केला.