ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 16 - सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदे पटकावणारा स्वीत्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने आज अजून एका विक्रमाला गवसणी घातली. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत मारिन सिलिचवर 6-3, 6-1, 6-4 अशी सरळ सेटमध्ये मात करत फेडररने विक्रमी आठव्यांदा विम्बल्डनच्या विजेतेपदाला गवसणी घातली. फेडररचे हे कारकिर्दीतील 19 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले आहे. त्याबरोबरच आठ वेळा विम्बल्डनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला टेनिसपटू ठरला आहे. याआधी विल्यम रेनेश़ॉ आणि पीट संप्रास यांनी प्रत्येकी सात वेळा विम्बल्डनच्या विजेतेपदांना गवसणी घातली होती.
हिरवळीवरचा राजा असा लौकिक असलेल्या फेडररने आज झालेल्या विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत पूर्ण वर्चस्वानिशी खेळ केला. स्वीत्झर्लंडच्या या महान खेळाडूच्या आव्हानाचा सामना करणे प्रतिस्पर्धी मारिन सिलिचला शक्य झाले नाही. पहिला गेम जिंकत सिलिचने चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर फेडररच्या आव्हानासमोर त्याची डाळ शिजली नाही.
पहिल्या सेटमध्ये 6-3 ने बाजी मारल्यानंतर फेडररने सिलिचसाठी पुनरागमनाची कोणतीही वाट ठेवली नाही. दुसऱ्या सेटमध्ये सिलिच फेडररच्या आक्रमणापुढे पूर्णपणे निष्प्रभ झालेला दिसला. त्याचा फायदा उठवत फेडररने हा सेट 6-1 अशा फरकाने खिशात घातला. त्यानंतर तिसरा सेट 6-4 ने जिंकून फेडररने सामन्यासह विम्बल्डनच्या आठव्या विजेतेपदावर अगदी दिमाखात कब्जा केला.
तत्पूर्वी उपांत्य फेरीत ३५ वर्षीय फेडररने झेक प्रजासत्ताच्या ३१ वर्षीय थॉमस बर्डिचचे कडवे आव्हान 7-6, 7-6, 6-4 असे परतवले होते. तर पहिल्यांदाच विम्बल्डनची अंतिम सिलिचने गाठताना अमेरिकेच्या सॅम क्युरे याला नमवले होते. दोन तास 56 मिनिटांपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात सिलिचने क्युरेला 7-6, 4-6, 7-6, 7-5 असे पराभूत केले.
हा सामना चुरशीचा झाला. सिलिचने शानदार झुंज दिली तो हीरो आहे. स्पर्धेतील शानदार कामगिरीसाठी तुझे अभिनंदन मरिन. हा खूप विशेष क्षण आणि मला आशा आहे की भविष्यातही आपण अनेक शानदार सामने खेळू. मी घेतलेल्या विश्रांतीचा मला फायदा झाला. मी तंदुरुस्त राहिल्यानेच आज ट्रॉफी जिंकू शकलो. येथे पुन्हा येऊन खूप चांगले वाटत आहे आणि एकही सेट न गमावता ट्रॉफी जिंकणे ही जादुई कामगिरी आहे. मला या कामगिरीचा अजूनही विश्वास बसत नाही. - रॉजर फेडररमाझ्या पुर्ण कारकिर्दीमध्ये सामना सुरु झाल्यानंतर मी कधीच सहजासहजी लढत गमावली नाही. मी माझ्यापरीने या लढतीत सर्वोत्तम खेळ केला. यंदाच्या विम्बल्डनमधील माझा प्रवास शानदार ठरला आणि माझ्या आयुष्यातील उत्कृष्ट टेनिस खेळलो. यासाठी मी माझ्यावर खूप मेहनत घेतलेल्या माझ्या संघाचे आभार मानेल. येथे मी पुन्हा विजेतेपदासाठी नक्कीच पुन्हा प्रयत्न करेन. - मरिन सिलिच
फेड एक्स्प्रेसचा पराक्रम-फेडररने सर्वाधिक १९ ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. यानंतर स्पेनच्या नदालच्या नावावर १५ ग्रँडस्लॅमची नोंद आहे.फेडररने सर्वाधिक ८ विम्बल्डन जिंकण्याचा विश्वविक्रम नोंदवला. अमेरिकेचा दिग्गज पीट सँप्रासच्या नावावर ७ विम्बल्डन जेतेपद आहेत. ३५ वर्षीय फेडरर विम्बल्डन जिंकणारा सर्वांत वयस्कर खेळाडू ठरला. याआधी अमेरिकेच्या दिग्गज आर्थर अॅश यांनी वयाच्या ३२व्या वर्षी विम्बल्डन जिंकले होते. या अंतिम सामन्याआधी फेडररचा सिलिच विरुद्ध ६-१ असा रेकॉर्ड होता. आता तो ७-१ असा झाला आहे. फेडरर विक्रमी अकराव्यांदा विम्बल्डनचा अंतिम सामना खेळला. अशी कामगिरी कोणत्याही खेळाडूने कोणत्याही स्पर्धेत केलेली नाही. आॅर्थर गोरे आणि विलियम रेनशॉ यांनी फेडरर नंतर प्रत्येकी ८ अंतिम सामने खेळले आहेत. तब्बल २९व्यांदा फेडरर ग्रँडस्लॅम अंतिम सामना खेळला. यानंतर नदालने २२ ग्रँडस्लॅम अंतिम सामने खेळले आहेत. सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचच्या नावावर २१ ग्रँडस्लॅम अंतिम सामने आहेत. २०१४ साली यूएस ओपनमध्ये सिलिचने फेडररला नमवले होते. विम्बल्डन अंतिम सामना खेळणारा सिलिच १६ वर्षातील क्रोएशियाचा पहिला खेळाडू ठरला. हिंगीस-मरे अजिंक्य-स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस आणि ब्रिटनचा जेमी मरे या अव्वल मानांकीत जोडीने अपेक्षित कामगिरी करताना मिश्र दुहेरीचे सहज विजेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात हीथर वॉटसन (ब्रिटन) - हेन्री कॉन्टीनेन (फिनलँड) या जोडीचा ६-४, ६-४ असा धुव्वा उडवला. कुबोट - मेलो यांचा रोमांचक विजय-अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात पोलंडच्या लुकास कुबोट आणि ब्राझीलच्या मार्सेलो मेलो या जोडीने रोमांचक बाजी मारताना विम्बल्डनच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी, महिला गटात इकटेरिना मकरोवा - इलेना वेसनिनाय आ रशियन आॅलिम्पिक सुवर्ण विजेत्या जोडीने विजेतेपदाला गवसणी घातली. पुरुषांच्या ४ तास ३९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात कुबोट - मेलो यांनी पिछाडीवरुन बाजी मारताना ओलिव्हर मराच (आॅस्ट्रिया) - मेट पाविच (क्रोएशिया) या जोडीचे कडवे आव्हान ५-७, ७-५, ७-६, ३-६, १३-११ असे परतावले. एकतर्फी झालेल्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात मकारोवा-वेसनिना यांनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना चिंग चान (तैवान) - मोनिका निकोलस्कु (रोमानिया) यांचा ६-०, ६-० असा धुव्वा उडवला. मकारोवा वेसनिना या बलाढ्य जोडीपुढे चान मोनिका यांना एकही गेम जिंकता आला नाही. हा सामना केवळ ५५ मिनिटांमध्ये जिंकताना मकारोवा- वेसनिना यांनी जेतेपदावर कब्जा केला.