एकीकडे क्रिकेटद्वारे अवघ्या जगावर राज्य करत असलेल्या भारतासाठी फुटबॉलमध्ये आजचा काळा दिवस उजाडला आहे. फुटबॉलची जागतिक संघटना फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी लादली आहे. यामुळे जोवर हा बॅन उठविला जात नाही, तोवर भारतीय फुटबॉल संघ कोणतेही सामने खेळू शकणार नाही. यापेक्षा मोठा धक्का म्हणजे महिलांचा अंडर १७ वर्ल्ड कप येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात होणार होता, तो देखील फिफाने हिसकावून घेतला आहे.
तिसऱ्या पक्षाने अनावश्यक हस्तक्षेप केल्याचे कारण देत फिफाने सोमवारी रात्री हा कठोर निर्णय घेतला. भारतीय महासंघावरील बॅन आता तात्काळ प्रभावाने लागू होत असल्याचे फिफाने म्हटले आहे. "एआयएफएफ (ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन) ने आपली कार्यकारिणी जाहीर केली तरच हे निलंबन मागे घेण्यात येईल.'', असे फिफाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर देशातील फुटबॉलचे कामकाज प्रशासकीय समिती (CoA) पाहत आहे. फिफा भारताच्या क्रीडा मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहे आणि सकारात्मक निर्णयापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने (CoA) निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. 28 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.
प्रफुल्ल पटेल कारण? अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल या साऱ्या वादाला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. 2004 मध्ये यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल यांना 2009 मध्ये भारतीय फुटबॉल महासंघाचा अध्यक्ष बनविण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 2022 मध्ये पदावरून काढून टाकेपर्यंत ते अध्यक्ष होते. भारतीय क्रीडा संहितेनुसार कोणतीही व्यक्ती ३ पेक्षा जास्त वेळा अध्यक्ष राहू शकत नाही. प्रफुल्ल पटेल राज्य संघटनांच्या संगनमताने निवडणुका होऊ देत नाहीएत, असा आरोप आहे.