थुमामा : १६ वर्षांनंतर फिफा विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ शनिवारी प्रथमच बाद फेरीत दाखल झालेल्या मोरोक्कोविरुद्ध दोन हात करणार आहे. आतापर्यंत विश्वचषकात उभय संघ आमने-सामने येण्याची ही तिसरी वेळ असेल.
रोनाल्डोला बाकावर बसवून खेळणाऱ्या पोर्तुगालने स्वित्झर्लंडला ६-१ ने नमवून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली; तर मोरोक्कोने २०१० चा चॅम्पियन स्पेनविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून हा टप्पा गाठला. २०१८ च्या विश्वचषकात पोर्तुगालने मोरोक्कोला १-० ने धूळ चारली होती. त्याआधी मात्र १९८६ ला मोरोक्कोने पोर्तुगालचा ३-१ असा पराभव केला होता. यंदा मोरोक्कोसारखा नवोदित संघ लक्षवेधी ठरला. या टप्प्यापर्यंत पोहोचलेला तो पहिला अरब आणि चौथा आफ्रिकी संघ ठरला.
याशिवाय धक्कादायक निकालांच्या या स्पर्धेतले शिल्लक प्रकरण म्हणूनही या संघाकडे पाहता येईल. रोनाल्डोशिवाय पोर्तुगाल नुसताच नव्हे, तर दिमाखात जिंकू शकतो हे स्वित्झर्लंडविरुद्ध दिसून आले आहे. शिवाय ब्राझीलप्रमाणेच पोर्तुगालचा खेळही आधीच्या फेरीमध्ये प्रवाही आणि आकर्षक होता. परंतु, या टप्प्यावर निव्वळ कौशल्यापेक्षा अनुभवही निर्णायक ठरत असतो. त्यामुळेच माजी विजेत्या संघाला मोरोक्कोच्या तुलनेत अधिक संधी असेल, असे भाकीत करता येईल.
इंग्लंडपुढे फ्रान्सचा कठीण पेपर
दोहा : गतविजेता फ्रान्स आणि इंग्लंड या फुटबॉलमधील महाशक्तींमध्ये रंगणारे द्वंद चाहत्यांसाठी अफलातून खेळाची मेजवानी पेश करणारे ठरू शकते. कारण, दोन्ही संघांमध्ये उत्तमोत्तम खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे प्रत्येक गोलसाठी चुरस पाहायला मिळू शकते. मात्र, दोन्ही संघांचे एकूण बलाबल लक्षात घेता गतविजेता फ्रान्स काहीसा वरचढ भासतो आहे. मात्र, इंग्लंड यंदाच्या विश्वचषकात एकाही सामन्यात पराभूत झालेला नाही, तर फ्रान्सला मात्र ट्युनिशियाकडून १-० असा अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला.
एमब्बाप्पे विरुद्ध वॉकरफ्रान्सला जर रोखायचे असेल तर प्रतिस्पर्धी संघाला सर्वांत आधी एमबाप्पेला आवर घालणे गरजेचे ठरते. गेल्या विश्वचषकापासून केलेल्या एकूण गोलपैकी सात गोलमध्ये एमब्बापेचा सहभाग होता. कारण, एकदा एमब्बाने चेंडूवर ताबा मिळवला तर त्याच्या वेगाशी बरोबरी करणे अनेक खेळाडूंना जमत नाही. अशात कायले वॉकर इंग्लंडसाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतो. चॅम्पियन लीगमध्ये तीनवेळा वॉकरने एमब्बापेला रोखले होते.
केन विरुद्ध गिरुडदोन्ही आपापल्या संघांचे प्रमुख स्ट्रायकर आहेत. ऑलिव्हर गिरुड नुकताच फ्रान्सकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. तर हॅरी केनला वेन रुनीचा एक विक्रम खुणावतो आहे. संघाचे आधारस्तंभ असलेल्या या दोघांच्या कामगिरीवरच संघाचे यशापयश अवलंबून आहे. पण डी मध्ये आतापर्यंत गिरुडकडून अधिक प्रभावी खेळ पाहायला मिळाला आहे.