जिनेव्हा : कतार येथे २०२२ च्या फुटबॉल विश्वचषकाचे यशस्वी आयोजन केल्यामुळे जागतिक फुटबॉलचे संचालन करणाऱ्या फिफाकडे जवळपास चार अब्ज डॉलर इतकी निव्वळ रक्कम शिल्लक आहे. अमेरिकेत २०२६ ला होणाऱ्या विश्वचषकाची आदरातिथ्य व्यवस्था तसेच तिकीट विक्रीतून अनेक अब्ज डॉलरची भर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
फिफाने २०२२ च्या वार्षिक अहवालात आर्थिक सुबत्तेची आकडेवारी जाहीर केली. फिफा प्रमुख जियानी इन्फेंटिनो यांच्या वार्षिक बोनसमध्ये सहा लाख ७३ हजार डॉलर इतकी वाढ झाली आहे. त्यांचे वेतन ३९ लाख डॉलर इतके असून, फिफाद्वारा त्यांच्या अन्य खर्च उचलला जातो. नोव्हेंबरमध्ये विश्वचषकादरम्यान मागील चार वर्षांत फिफाने सात अब्ज ६० कोटी डॉलरचा विक्रमी महसूल प्राप्त केल्याची घोषणा केली होती.