नवी दिल्ली : भारताचा कर्णधार आणि आधुनिक भारतीय फुटबॉलचा चेहरा असलेल्या सुनील छेत्री याला जागतिक फुटबॉलचे संचलन करणाऱ्या फिफाने सन्मानित केले. आतापर्यंत छेत्रीने दिलेले योगदान, त्याचा जीवन प्रवास आणि त्याची फुटबॉल कारकीर्द याची माहिती जगभरातील फुटबॉलप्रेमींना करून देण्यासाठी फिफाने तीन भागांची एक विशेष मालिका प्रसारित केली आहे.
फिफाने आपल्या विश्वचषक हँडलवर ट्वीट केले आहे की, ‘तुम्हाला रोनाल्डो आणि मेस्सीबाबत सर्वकाही माहीत आहे; पण आता सक्रिय फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूची गोष्ट जाणून घ्या. सुनील छेत्री- कॅप्टन फँटास्टिक.’ ही मालिका चाहत्यांना फिफाच्या फिफा प्लस या त्यांच्या स्ट्रीमिंग ॲपवर पाहता येईल.
भारताचा सुपरस्टार छेत्री याने आतापर्यंत ८४ आंतरराष्ट्रीय गोल नोंदवले आहेत. सक्रिय फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये तो तिसऱ्या स्थानी आहे. रोनाल्डो (११७) आणि मेस्सी (९०) केवळ हेच दोन दिग्गज छेत्रीच्या पुढे आहेत.
अशी आहे मालिका
- या मालिकेतील पहिल्या भागामध्ये भारताकडून पदार्पण केलेल्या २० वर्षीय छेत्रीची गोष्ट कळणार आहे. यासोबतच त्याने जिवलग मित्र, कुटुंबीय आणि फुटबॉल सहकाऱ्यांसह खुद्द छेत्रीही आपल्या प्रवासाची माहिती देईल.
- दुसऱ्या मालिकेत राष्ट्रीय संघ तसेच विविध क्लबकडून खेळताना शानदार कामगिरीची माहिती देण्यात येईल. अखेरच्या भागामध्ये छेत्रीचे व्यावसायिक कारकिर्दीमधील यश आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती समोर आणण्यात आली आहे.
- `छेत्रीने भारताकडून २००५ साली फुटबॉलमध्ये पदार्पण केले असून, त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय १३१ सामने खेळले आहेत.