अभिजित देशमुख
दोहा : डेन्मार्कविरुद्ध फ्रान्सच्या विजयानंतर माध्यमांशी बोलण्यास नकार देणारा कायलियन एमबाप्पेला फिफाकडून दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे. सामनावीर ठरलेल्या एमबाप्पेला आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून टीकेचे धनी व्हावे लागेल, असेही म्हटले जात आहे. त्याआधी, फ्रान्सने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही २३ वर्षांच्या एमबाप्पेने माध्यमांना टाळले होते.
फ्रेंच फुटबॉल फेडरेशनने इशारा दिल्यानंतरही एमबाप्पेने दुर्लक्ष करीत डेन्मार्कवरील विजयानंतर पुन्हा चूक केली. यामुळे एमबाप्पे आणि फ्रेंच फुटबॉल फेडरेशन दोघेही फिफाकडून दंडित होऊ शकतात. आपल्या भविष्याबाबत प्रश्न विचारला जाऊ शकतो, अशी शंका आल्याने एमबाप्पेने माध्यमांना टाळल्याचे म्हटले जाते. घानाविरुद्ध सलामीच्या सामन्यानंतर पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डोनेही पत्रकाच्या मँचेस्टर युनायटेडने संपुष्टात आणलेल्या करारावरील प्रश्नाला बगल दिली होती. बाद फेरी गाठणारा सेनेगलदेखील अडचणीत आला. प्रत्येक संघाने सामन्याच्या आदल्या दिवशी मुख्य माध्यम कक्षात पत्रपरिषद घेणे अनिवार्य आहे. यावेळी संघाचे प्रशिक्षक, एक खेळाडू, त्यातही कर्णधाराने हजेरी लावणे आवश्यक आहे. सेनेगलने ही परंपरा खंडित केल्याने फिफाकडून चौकशी होईल, असे बुधवारी सांगण्यात आले.
शिस्तभंग कारवाईची बुधवारी झाली घोषणा नेदरलँड्सविरुद्ध सलामी लढतीच्या आदल्या दिवशी सेनेगलकडून आक्रमक फळीतील क्रेपिन डायटा आणि कर्णधार कॉलिबली या दोघांनी प्रशिक्षक ॲलिउ सिसे यांच्यासोबत पत्रकार कक्षात हजेरी लावली. तथापि, इक्वेडोरविरुद्धच्या सामन्याआधी एकही खेळाडू उपस्थित नव्हता. एकटे प्रशिक्षक ४० मिनिटे संवाद साधत होते. फिफाने याप्रकरणी बुधवारी सकाळी शिस्तभंगाच्या कारवाईची घोषणा केली. सेनेगल फुटबॉल महासंघाविरुद्ध ‘फिफा विश्वचषक कतार २०२२’च्या नियम ४४ तसेच माध्यम आणि विपणन नियम २.७.२ नुसार कारवाई सुरू करणार असल्याचे फिफाने म्हटले आहे.