Rainbow T-Shirt: कतारमध्ये सुरू झालेला FIFA World Cup 2022 सध्या विविध मुद्द्यांनी गाजतोय. सुरूवातीला वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक यांना आमंत्रित केल्याने वाद उपस्थित झाला होता. त्यानंतर, इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात इराणच्या संघाने आपल्याच सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी सामन्याआधी राष्ट्रगीत गायले नाही. पाठोपाठ अर्जेंटिनाच्या एका महिला पत्रकाराची रिपोर्टिंग करताना बॅग चोरीला गेली आणि त्यानंतर आता एका अमेरिकन पत्रकारानेही असाच एक खळबळजनक दावा केला आहे.
एका अमेरिकन पत्रकाराचे म्हणणे आहे की त्याने सोमवारी कतारमधील फुटबॉल वर्ल्ड कप स्टेडियममध्ये प्रवेश केला, तेव्हा त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने जो टी-शर्ट घातला होता त्यावरून सारा वादंग झाला. त्यानंतर सामना पाहायला जायचे असेल तर टी-शर्ट काढून जा, असा अजब सल्ला त्याला देण्यात आला होता.
आत जायचं असेल तर टी-शर्ट काढून जा!
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, प्रसिद्ध क्रीडा पत्रकार ग्रँट वाहल (Grant Wahl) याने त्याच्या वेबसाइटवरून अनुभव सांगितला. विश्वचषकाच्या सुरक्षा अधिकार्यांनी त्याला अमेरिका विरूद्ध वेल्स सामन्यात घुसू दिले नाही. अहमद बिन अली स्टेडियम येथे हा सामना सुरू असताना त्याला प्रवेश दिला गेला नाही. याउलट त्याला शर्ट काढण्यास सांगण्यात आले. त्याने याबाबत ट्विट केल्यावर त्याचा फोनही काढून घेण्यात आल्याचे त्याने सांगितले. वाहलने ट्विटरवर लिहिले की, 'मी ठीक आहे, पण त्याची काहीच गरज नव्हती.'
टी-शर्ट का काढायला सांगितला?
अमेरिकन पत्रकाराने आपल्या देशाच्या धोरणांनुसार उदात्त विचारसरणीचा टी-शर्ट घातला होता. पण कतार मधील सुरक्षारक्षकांना त्यावरचा विचार अयोग्य वाटल्याने हा प्रकार घडला. पत्रकाराने एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाच्या समर्थनार्थ इंद्रधनुष्याचा टी-शर्ट घातला होता. कतारमध्ये समलैंगिक संबंध (Same Sex Relations) बेकायदेशीर मानले जातात. त्यामुळे त्याला अडवण्यात आले आणि टी-शर्ट काढायला सांगितले.
नंतर सुरक्षारक्षकांनी मागितली माफी
काही वेळीने सुरक्षा कमांडर नंतर त्याच्याकडे पोहोचले आणि त्यांनी पत्रकाराची माफी मागितली व त्याला स्टेडियममध्ये जाऊ दिले. नंतर त्याची आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशासकीय संस्था FIFA च्या प्रतिनिधींकडून माफी मागितली गेली.