कतार : सध्या कतारच्या धरतीवर विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज विश्वचषकाच्या सहाव्या दिवशी आशियाई संघ इराणने वेल्सचा पराभव करून पहिला विजय मिळवला. ग्रुप बी मध्ये वेल्सविरुद्धच्या सामन्यात इराणने नियमित वेळेनंतर इंज्युरी टाइममध्ये दोन गोल करून सामन्यावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह इराणचे तीन गुण झाले आहेत. तर वेल्सचे दोन सामन्यांत केवळ एक गुण आहे. इराणच्या संघाला आपल्या पहिल्या सामन्यात इंग्लिश संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
वेल्सचा वेन हेनेसी हा रेड कार्ड मिळवणारा विश्वचषकाच्या इतिहासातील तिसरा गोलरक्षक ठरला आहे. त्याआधी १९९४ मध्ये इटलीचा गोलरक्षक जियानलुका पेग्लियुका याला नॉर्वेविरुद्ध बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तर दक्षिण आफ्रिकेच्या इटुमलेंग कुनेला २०१०मध्ये उरुग्वेविरुद्धच्या सामन्यात रेड कार्ड मिळाले होते.
इराणने उघडले विजयाचे खाते इराणच्या संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र आजच्या सामन्यात त्यांनी पहिला गोल करून अभियानाची शानदार सुरूवात केली. रमीन रझियानने इंजरी टाइममध्ये (९०+११) गोल केला. यानंतर इराणच्या रुबेज चेश्मीने सामना संपण्याच्या एक मिनिट आधी गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने इंजरी टाइममध्ये गोल करून वेल्सला पराभवाचा धक्का दिला. लक्षणीय बाब म्हणजे या विश्वचषकातील पेनल्टी क्षेत्राबाहेर केलेला हा पहिला गोल आहे. कारण आतापर्यंत झालेले सर्व गोल पेनल्टीमध्ये आले आहेत. अखेर इराणने वेल्सवर २-० ने विजय मिळवून स्पर्धेत आपल्या विजयाचे खाते उघडले आहे.
दरम्यान, वेल्स आणि इराण या दोन्ही संघाना ७० मिनिटांपर्यंत एकही गोल करता आला नव्हता. नियोजित ९० मिनिटांची वेळ उलटून गेली तरी दोन्ही संघाच्या खात्यात भोपळा होता. मात्र इंजरी टाइममध्ये इराणने जोरदार पुनरागमन करून इतिहास घडवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"