नवी दिल्ली - फिफा वर्ल्डकप २०२२ च्या इतिहासात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या मोरक्को टीमचं कौतुक जगभरातील फुटबॉलप्रेमी करत आहेत. वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पराभूत होऊनही मोरक्को संघाने फुटबॉलच्या दिग्गजांमध्ये आपली छापच पाडली नाही तर जगभरातील क्रीडा चाहत्यांची मनेही जिंकली. मोरक्को अंतिम चारमध्ये पोहोचतील अशी अपेक्षा कोणालाच वाटली नसती, पण आपल्या ऐतिहासिक कामगिरीच्या बळावर दिग्गजांना मैदानात लोळवणाऱ्या मोरोक्को संघाने जगाच्या फुटबॉल इतिहासात एक सुवर्ण अध्याय लिहिला.
क्रोएशिया, बेल्जियम, स्पेन आणि क्रिस्टियानो रोनाल्डोचा पोर्तुगालचा स्पर्धेतील प्रवास संपवून मोरोक्को इथपर्यंत पोहोचला होता. तिसर्या क्रमांकाच्या विजेत्याला $27 मिलियन (रु. 220 कोटी) बक्षीस रक्कम मिळेल, जी विजेत्यापेक्षा $15 मिलियन कमी आहे. या विश्वचषकात 32 संघांमध्ये $440 मिलियन बक्षीस रक्कम वाटली जाईल. विजेत्या आणि उपविजेत्याला विजयात $72 मिलियनचे सर्वोच्च एकूण बक्षीस मिळेल. रविवारी फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम फेरीतील विजेत्या संघाला 42 मिलियन डॉलर म्हणजेच ३४७ कोटी रुपयांचे रोख बक्षीस मिळेल. त्याचबरोबर उपविजेत्या संघासाठी $30 मिलियनची बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. अहवालानुसार, प्रत्येक संघाला किमान $9 मिलियन बक्षीस रक्कम मिळेल.
मोरोक्कोचा हा प्रवास विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय स्पर्धांमध्ये गणला जाईल. उपांत्य फेरीपूर्वी या संघाने एकाही विरोधी खेळाडूला गोल करू दिला नाही. उपांत्य फेरीपूर्वी त्याला दोन खेळाडूंच्या दुखापतीचाही फटका सहन करावा लागला होता. डिफेंडर नायफ एगेर्ड सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला, तर कर्णधार रोमेन सीसला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने 21 मिनिटांनंतर बाहेर काढण्यात आले.
स्टेडियमच्या आत मोरक्को टीमच्या समर्थकांची संख्या पाहून जणू माणसांचा पूर आल्यासारखं वाटत होते. विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणाऱ्या पहिल्या आफ्रिकन संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहत्यांनी कोणतीही कसर सोडली नव्हती. स्टेडियममध्ये जेव्हा मोरोक्कोचे राष्ट्रगीत वाजले तेव्हा एकच उत्साह पाहायला मिळाला. फ्रान्ससारख्या दिग्गज संघालाही मोरक्कोनं गोल मारण्यासाठी झुलवत ठेवले. पण अखेरीस फ्रान्स संघाचा अनुभव मोरोक्कोच्या खेळावर भारी पडला. मोरोक्कोचे प्रशिक्षक वालिद रेग्रागुई म्हणाले, 'माझ्या खेळाडूंनी सर्व काही दिले. ते इथपर्यंत पोहोचले आहेत. त्यांना इतिहास घडवायचा होता पण चमत्काराने विश्वचषक जिंकता येत नाही. मेहनतीच्या बळावर हे शक्य झाले असून यापुढील काळातही आम्ही मेहनत करत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.