नवी दिल्ली : यंदा जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच फीफा विश्वचषकाचा (FIFA World Cup 2022) थरार कतारच्या धरतीवर रंगणार आहे. २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मोठ्या स्पर्धेसाठी कतार पूर्णपणे सज्ज होत आहे. यामध्ये सुमारे १२ लाख पर्यटक येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पाहुण्यांसाठी शहरात दारूची दुकानेही सुरू करण्यात आली होती. मात्र आता कतार प्रशासनाने बाजारपेठेतून दारूची दुकाने हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दारू कंपन्या आणि आयोजकांमध्ये खळबळ उडाली आहे.
खरं तर फीफा विश्वचषक पहिल्यांदाच कतारच्या धरतीवर होत आहे. या बहुचर्चित स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येण्याची शक्यता आहे. या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी कतार येथे जोरदार तयारी सुरू आहे. प्रेक्षकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून कतार प्रशासन अनेक उपक्रम राबवत आहे. कतारने येथील काही कडक कायदे देखील शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये दारू विक्री संबंधित नियमांचा देखील समावेश आहे.
दारू कंपन्यांना मोठा झटका कतार येथे फीफा विश्वचषकाची स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच दारू विक्रेते आणि आयोजकांना मोठा झटका बसला आहे. कारण कतार प्रशासनाने बाजारातून दारूची दुकाने हटवण्याचे आदेश दिले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे या आयोजनामध्ये एक बिअर कंपनीचा देखील समावेश आहे. त्यांनी जवळपास ६०७ कोटी रूपये गुंतवले आहेत. अचानक आलेल्या आदेशांमुळे त्यांनाही झटका बसला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तसे केले नाही तर मोठी गडबड होण्याती भीती स्थानिकांमध्ये होती. जनतेची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यटकांसाठी उभारले 'फॅन झोन'२०१० मध्ये जेव्हा FIFA ने कतारला यजमानपद दिले होते, त्याच वेळी मद्यविक्री आणि प्रचाराबाबत करार करण्यात आला होता. मात्र कतारमध्ये दारूवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. कतारमधील काही हॉटेल्स आणि बारमध्ये दारू मिळणार आहे. परंतु बहुतेक ठिकाणी ते पिण्यास परवानगी दिली जाणार नाही. प्रेक्षक आणि पर्यटकांसाठी स्टेडियमपासून दूर फॅन झोन तयार केला जात असला तरी येथून स्टेडियम ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
यावेळी विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊसअलीकडेच फीफा विश्वचषकाची बक्षीस रक्कम देखील जाहीर करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण विश्वचषकात वाटण्यात येणारी बक्षीस रक्कम सुमारे 3,585 कोटी एवढी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये विश्वचषक विजेत्या संघाला ४२ मिलियन म्हणजेच सुमारे ३४२ कोटी रूपये मिळणार आहेत. मागील अर्थात २०१८च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम ४ मिलियन डॉलरहून अधिक आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"